मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी डिजिटल इंडियाची घोषणा केली होती. मात्र २०१४ पासून देशात आतापर्यंत ३५७ वेळा इंटरनेट सेवा खंडित करण्यात आल्याची आकडेवारी समोर आली आहे. गेल्या वर्षात सर्वाधिक १३४ वेळा इंटरनेट सेवा बंद करण्यात आली. गेल्या वर्षात जगभरात झालेल्या इंटरनेट बंदीच्या घटनांची आकडेवारी पाहिल्यास त्यातील तब्बल ६७ टक्के घटना भारतात घडल्या आहेत. तर चालू वर्षात आतापर्यंत ९३ वेळा इंटरनेट सेवा बंद करण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे. जम्मू काश्मीरमधून कलम ३७० हटवल्यानंतर मोदी सरकारनं खबरदारीचा उपाय म्हणून इंटरनेट सेवा खंडित करण्याचा निर्णय घेतला. शंभरपेक्षा अधिक दिवस जम्मू काश्मीरमध्ये इंटरनेट सेवा बंद होती. आता सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधात जवळपास देशभरात आंदोलनं सुरू आहेत. आसामसह ईशान्य भारतामधून या आंदोलनांना सुरुवात झाली. या आंदोलनांची तीव्रतादेखील जास्त आहे. त्यामुळेच ईशान्य भारतामधील बऱ्याच भागांमधील इंटरनेट सेवा खंडित करण्यात आली. २०१४ पासून देशभरात करण्यात इंटरनेट बंदीची आकडेवारी इंडिया टुडेनं प्रसिद्ध केली आहे. यानुसार २०१४ पासून आतापर्यंत देशात ३५७ वेळा इंटरनेट सेवा खंडित करण्यात आली होती. २०१४ मध्ये सहावेळा इंटरनेट सेवा बंद करण्यात आली. यानंतर इंटरनेट सेवा खंडित करण्याचं प्रमाण दुपटीनं वाढू लागलं. २०१५ मध्ये १४ वेळा, २०१६ मध्ये ३१ वेळा, २०१७ मध्ये ७९ वेळा इंटरनेट सेवा बंद ठेवण्यात आली. २०१८ मध्ये हे प्रमाण थेट १३४ वर गेलं. चालू वर्षात १५ डिसेंबरपर्यंत देशात ९३ वेळा इंटरनेट सेवा खंडित करण्यात आली आहे.
डिजिटल इंडिया? 2014 पासून देशात 350 पेक्षा अधिकवेळा इंटरनेट सेवा खंडित
By ऑनलाइन लोकमत | Published: December 18, 2019 7:47 PM