-नितीन अग्रवालनवी दिल्ली : २०२४ पर्यंत घरोघरी नळाने पाणी पुरवठा केला जाईल, असा दावा केंद्र सरकार करीत आहे; परंतु, महाराष्ट्रातील २२ टक्के गावांत हे शक्य झाले आहे. राज्यातील ३१,६२६ गावे नळपाणी योजनेपासून दूर आहेत. यापैकी २९,१४२ गावांत अजूनही नळपाणी योजनेचे काम सुरू झालेले नाही.
महाराष्ट्रातील ३६ टक्के घरांत नळाने पाणी पोहोचलेले नाही. सरकारी आकडेवारीनुसार ९१.८२ लाख घरांना नळाने पाणी पुरवठा होत आहे. आकडेवारीनुसार राज्यातील जालना जिल्ह्यातील सर्व घरांना नळाने पाणी पुरवठा केला जात आहे. आतापर्यंत नळपाणी योजनेचे काम जालना जिल्ह्यात ९९.५१ टक्के, धुळे जिल्ह्यात ९०.९३ टक्के, कोल्हापूरमध्ये ८१.५३ टक्के, वर्धा जिल्ह्यात ७९.७९ टक्के आणि नागपूर जिल्ह्यात ७५.३९ टक्के झाले आहे. याबाबतीत पालघर (३२.४४ टक्के), चंद्रपूर (३८.४३ टक्के), नंदुरबार (३८.९६ टक्के), बीड (३९.९६ टक्के), गडचिरोली ( ४४.८७ टक्के), वाशिम (४७.२९ टक्के) आणि यवतमाळ (४८.१९ टक्के) मागे आहे.
४३.३८ लाख घरांना नळपाणी योजनेचा लाभ...
पंतप्रधान मोदी यांंनी १५ ऑगस्ट २०१९ रोजी प्रत्येक घरात नळाने पाणीपुरवठा करण्याची घोषणा केली होती. तेव्हापासून महाराष्ट्रातील ४३,३८,८४१ घरांना नळाने पाणीपुरवठा करण्यात आला. सर्वाधिक घरे अहमदनगर (३,३०,७१५), जळगाव (२,८८,४९५), नाशिक (२,५९,८७८), पुणे (२,५९,५३८), सोलापूर (२,०१,४८४), यवतमाळ (१,८४,२४८) आणि कोल्हापूरमधील (१,८३,१८७) आहेत.