नवी दिल्ली : कोरोनानंतर जगात संसर्ग होत असलेल्या नव्या ओमायक्रॉन व्हेरिएंटची चाचणी करण्यासाठी देशात ३६ प्रयोगशाळा सज्ज असून, यात एकाच दिवशी ३० हजार नमुन्यांची तपासणी होऊ शकते, अशी माहिती केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांनी लोकसभेत प्रश्नोत्तर तासात दिली.
काँग्रेसचे खासदार सुरेश धानोरकर (चंद्रपूर-वणी) यांनी ओमायक्रॉन विषाणू देशात आढळून आल्यानंतर कोव्हॅक्सिन व कोविशिल्ड लस किती प्रभावी आहे? ओमायक्रॉनच्या नव्या प्रारूपावर उपाययोजना करण्यासाठी केंद्राने काही विशेष दिशानिर्देश जारी केले आहे काय, असा प्रश्न विचारला होता.
यावर उत्तर देताना मांडविया म्हणाले, ओमायक्रॉनचा नवा विषाणू नोव्हेंबर महिन्यात दक्षिण आफ्रिकेत, तर भारतात तो १ डिसेंबरला आढळला आहे. जवळपास ५९ देशांमध्ये या विषाणूने पाय पसरलेले आहेत. कोविशिल्ड व कोव्हॅक्सिन या लसींचा या विषाणूचा संसर्ग झालेल्यांवर काय परिणाम होत आहे, याचा जगामध्ये अभ्यास सुरू असल्याचे मांडविया यांनी सांगितले. या नव्या विषाणूची चाचणी करण्यासाठी देशात पुरेशी व्यवस्था आहे काय? तसेच तिसऱ्या संभाव्य लाटेत लहान मुलांवर परिणाम होईल, असे बोलले जात आहे. यासाठी काही विशेष निर्देश दिले आहे, असा पुरवणी प्रश्न खासदार धानोरकर यांनी विचारला. यावर उत्तर देताना आरोग्यमंत्री मांडविया म्हणाले, देशात यासाठी ३६ प्रयोगशाळा सज्ज आहेत. यातून रोज ३० हजार नमुन्यांची तपासणी होऊ शकते.
३५ टक्के लोकांना कोरोनाचे दोन्ही डोसकोरोना लसीकरणाचे देशात अत्यंत चांगले कार्य सुरू असून देशात आतापर्यंत १३० कोटी लोकांचे लसीकरण झालेले आहे. देशातील ५८ टक्के लोकांनी कोरोनाची पहिली लस घेतली आहे; तर ३५ टक्के लोकांनी दोन्ही लसीकरणाचे दोन्ही डोस घेतले असल्याचे आरोग्यमंत्री मांडविया यांनी सांगितले. या संदर्भात आरएसपीचे एस. प्रेमचंद्रन यांनी प्रश्न विचारला होता.