नवी दिल्ली - देशात ब्लॅक फंगसचा कहर पाहायला मिळत असून वाढत्या रुग्णसंख्येने प्रशासनाची चिंता वाढवली आहे. या रुग्णांच्या संख्येत वेगाने वाढ होत असल्याचं पाहायला मिळत आहे. ब्लॅक फंगसला काही राज्यांमध्ये महामारी घोषित करण्यात आलं आहे. केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी याबाबत माहिती दिली आहे. 24 मे रोजी सकाळपर्यंत देशातील एकूण 18 राज्यांमध्ये म्युकोरमायकोसिसचे (ब्लॅक फंगस) एकूण 5 हजार 424 रुग्ण आढळून आले आहेत. याच दरम्यान आता धक्कादायक माहिती समोर आली आहे. आयसीएमआरने (ICMR) एका अभ्यासानुसार असा दावा केला आहे की, दुसऱ्या लाटेत रुग्णालयात दाखल झालेले जवळपास 3.6 टक्के रुग्ण सेकंडरी बॅक्टिरीयल आणि फंगल इन्फेक्शनग्रस्त आहेत.
आयसीएमआरने हा अहवाल सोमवारी प्रकाशित केला. यामध्ये फंगल इन्फेक्शन संदर्भात महत्त्वाची माहिती देण्यात आली आहे. कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेमध्ये सेकंडरी बॅक्टिरीयल रुग्णांमध्ये मृत्यूचे प्रमाण वाढून 56.7 टक्के झाले आहे. तर रुग्णालयात दाखल झालेल्या रुग्णांमध्ये हे प्रमाण 10.6 टक्के आहे. दुसऱ्या लाटेमध्ये कोरोनाबाधित रुग्णांचा सेकंडरी बॅक्टिरीयलमुळे मृत्यूदर 78.9 टक्क्यांपर्यंत वाढला होता. सर गंगा राम रुग्णालयाच्या सूक्ष्म जीव विज्ञान विभागाचे प्रमुख डॉ. चंद वट्टल यांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरोनाग्रस्तांच्या मृत्यूदरामध्ये वाढ झाली आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये स्टेरॉईडचा अती वापर केल्यामुळं या प्रकारचे रुग्ण वाढले आहेत असं म्हटलं आहे.
देशात दुसरी लाट ज्यावेळी थैमान घालत होती. त्यावेळी बाजारातून ही स्टेरॉईड औषध गायब झाली होती. असं यापूर्वी कधीच झालं नव्हतं. ज्यादा शक्तिशाली औषधांचा रुग्णांवर मारा करणे घातक ठरू शकते याविषयी इशारा देण्यात आला आहे, असं सांगितलं. हिंदुस्तान टाइम्सने याबाबतचे वृत्त दिले आहे. महाराष्ट्र, गुजरात, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, हरियाणा, आंध्र प्रदेश, गुजरात या राज्यांमध्ये मोठ्या संख्येनं रुग्ण आढळून आल्याची माहिती केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी दिली आहे. तसेच गुजरातमध्ये 2 हजार 165, महाराष्ट्रात 1 हजार 188, उत्तर प्रदेशात 663, मध्य प्रदेशात 519, हरियाणात 339 आणि आंध्र प्रदेशात 248 म्युकोरमायकोसिसचे रुग्ण आढळले आहेत.
चिंता वाढली! देशात Black Fungus चा कहर, 18 राज्यांत तब्बल 5,424 रुग्ण; 'या' लोकांना सर्वाधिक धोका
देशात आढळलेल्या म्युकोरमायकोसिसच्या 5 हजार 424 रुग्णांपैकी 4 हजार 556 जणांना कोरोनाची लागण झाली होती, तर 55 टक्के रुग्णांना पहिल्यापासूनच मधुमेहाची समस्या होती. 'ब्लॅक फंगस' म्हणजेच "म्युकोरमायकोसिस" हे एक गंभीर इन्फेक्शन आहे. ज्याचा परिणाम नाक, डोळ्यांवर होतो आणि मेंदूपर्यंतही हे इन्फेक्शन पोहोचतं. या इन्फेक्शनमुळे रुग्णांचे डोळेही काढावे लागत आहेत. कोरोनानंतर आता 'ब्लॅक फंगस'चा मोठा धोका असल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याच दरम्यान मध्य प्रदेशच्या जबलपूरमधील एका डॉक्टरने यावर प्रभावी आणि अगदी किफायशीर असा उपचार केल्याचा दावा केला आहे. या डॉक्टरने 100 वर्षांपेक्षा जास्त जुना फॉर्म्युला सांगितला आहे. हा उपाय सर्वात स्वस्त आणि अचूक असल्याचं या डॉक्टरने सांगितलं आहे. जबलपूरमधील डॉ. अमरेंद्र पांडे यांनी हा दावा केला आहे.