नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारमधील एकूण 57 मंत्र्यांपैकी 36 मंत्री या आठवड्यात जम्मू-काश्मीरचा दौरा करणार आहे. जम्मू-काश्मीरमध्ये कलम 370 रद्द करण्याचे फायदे आणि केंद्र सरकारने जम्मू-काश्मीरसाठी सुरू केलेल्या योजना सांगण्यासाठी 36 मंत्री जम्मू-काश्मीरचा दौरा करणार आहेत.
जम्मू-काश्मीरमधील जनतेशी संवाद साधून त्यांना केंद्र सरकारने सुरु केलेल्या योजनेची माहिती सांगणार आहेत. हे 36 मंत्री हे 18 जानेवारीपासून जम्मू-काश्मीरचा दौरा सुरू करणार आहे. यामध्ये केंद्रीय मंत्री स्मृती ईराणी, रविशंकर प्रसाद, पीयूष गोयल, जितेंद्र सिंह, अनुराग ठाकूर यांच्यासह 36 मंत्र्यांचा समावेश आहे. या मंत्र्यांचा दौरा 18 जानेवारीपासून हा दौरा सुरू होणार असल्याचे केंद्र सरकारने राज्य सरकारला पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे.
या मंत्र्यांचा जम्मू-काश्मीर दौऱ्याचा अंतिम निर्णय 17 जानेवारी रोजी होणाऱ्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत होणार आहे. केंद्र सरकारने गेल्यावर्षी 5 ऑगस्टला जम्मू काश्मीरमधील कलम 370 रद्द केल्यानंतर पहिल्यांदाच केंद्रीय मंत्र्यांचा हा दौरा आहे. तसेच, केंद्र शासित राज्य बनवल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये राबविण्यात येत असलेल्या योजनांची माहिती सर्वसामान्य लोकांना सांगण्यासाठी केंद्रीय मंत्री हा दौरा करणार आहेत. केंद्रीय गृहराज्यमंत्री किशन रेड्डी यांनी राज्य सरकारचे मुख्य सचिव बीव्हीआर सुब्रमण्यम यांना पत्र पाठवून या दौऱ्यासंबंधी माहिती दिली आहे.
या केंद्रीय मंत्र्यांचे जम्मूमध्ये 51दौरे असणार आहेत. तर 8 काश्मीरमध्ये दौरे असणार आहेत. केंद्रीय मंत्री स्मृती ईराणी 19 जानेवारीला कटडा आणि रियासी जिल्ह्याला भेट देणार आहेत. तर त्याच दिवशी रेल्वेमंत्री पीयूष गोयल श्रीगरचा दौरा करणार आहेत. त्यानंतर 20 जानेवारी रोजी जनरल व्ही. के. सिंह उधमपूरला जाणार आहेत. 21 जानेवारी रोजी किरेन रिजिजू जम्मू-काश्मीरच्या सीमांत परिसरातील सुचेतागढला जाणार आहेत.
याशिवाय, 22 जानेवारी रोजी गृह राज्य मंत्री जी. किशन रेड्डी गांदरबल आणि 23 जानेवारी रोजी मनीगामचा दौरा करणार आहेत. त्यानंतर 24 जानेवारी रोजी केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद बारामुलाच्या सोपोरचा दौरा करणार आहेत. केंद्रीय मंत्री आर के सिंह डोडा आणि संरक्षण राज्य मंत्री श्रीपद नाइक श्रीनगरचा दौरा करणार आहेत. तसेच, केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर, रमेश पोखरियाल निशंक, जितेंद्र सिंह सह अन्य काही केंद्रीय मंत्री राज्याचा दौरा करणार आहेत.
आणखी बातम्या
'अच्छे दिन' येतील तेव्हा येतील, पण निदान आधीचे 'बरे दिन' तरी आणा; महागाईवरुन शिवसेनेचा टोला
उद्धव ठाकरेंच्या शपथविधीवर किती खर्च झाला?; RTIमधून आकडेवारी समोर
दिल्लीत उघडली सिंचन घोटाळ्याची फाईल!; अजित पवार अडचणीत येणार?
काश्मीर खोऱ्यात बर्फवृष्टी सुरूच; धावपट्टीवर बर्फ साचल्यामुळे सर्व उड्डाणे रद्द