नवी दिल्ली : देशातील सर्वात मोठा सेवाउद्योग असूनही परंपरेने रूढ झालेली ‘व्हीआयपी’ संस्कृती मोडीत काढण्याचे रेल्वे प्रशासनाने ठरविले असून त्याचाच एक भाग म्हणून वरिष्ठ अधिका-यांना केवळ कार्यालयीन कामातच नव्हे तर घरीही सरंजामी राहणीमान सोडण्यास सांगण्यात आले आहे.रेल्वे अधिका-यांसाठी गेली ३६ वर्षे लागू असलेला ‘प्रोटोकॉल’ आता मागे घेण्यात आल्याचा आदेश रेल्वे मंत्रालयाने २९ सप्टेंबर रोजी काढला आहे. आधीच्या ‘प्रोटोकॉल’नुसार रेल्वे मंडळाचे अध्यक्ष आणि सदस्यांच्या भेटीच्या वेळी संबंधित विभागीय रेल्वेच्या महाव्यवस्थापकांसह वरिष्ठ अधिका-यांनी, इतर कामे सोडून, त्यांच्यासोबत हांजी-हांजी करत फिरावे, असे अपेक्षित होते. आता अधिका-यांची यातून सुटका करण्यात आली आहे. रेल्वेच्या कोणाही अधिकाºयाने कोणत्याही वेळी पुष्पगुच्छ किंवा भेटवस्तू स्वीकारू नयेत, असे निर्देश रेल्वे मंडळाचे अध्यक्ष अश्विनी लोहाणी यांनी दिले आहेत.वरिष्ठ अधिका-यांच्या घरी रेल्वेतील चतुर्थश्रेणी कर्मचा-यांनी घरगडी म्हणून काम करण्याची पद्धतही परंपरेने रूढ झाली आहे. अशा प्रकारे रेल्वेमार्गांच्या दुरुस्ती व देखभालीचे काम करणारे सुमारे ३० हजार कर्मचारी देशभरात वरिष्ठ अधिकाºयांच्या घरी कामाला असल्याचा अंदाज आहे. अशा सर्व कर्मचा-यांनी वरिष्ठ अधिका-यांच्या घरी काम न करता आपापले नेमून दिलेले काम करावे, असेही निर्देश देण्यात आले आहेत.काळानुरूप बदलायला हवे-रेल्वे मंडळाचा एक माजी सदस्य, नाव उघड न करण्याच्या अटीवर म्हणाला की, जेव्हा हा ‘प्रोटोकॉल’ तयार केला गेला तेव्हा तो तयार करणाºयांनी त्यासाठीची साधाक-बाधक कारणे नक्की विचारात घेतली असणार. पण आता काळ बदलल्याने तो सुरू ठेवण्याचे काही कारण नाही. कोणत्याही सार्वजनिक संस्थेने काळानुरूप बदलायला हवेच.अधिका-यांनी प्रवाशांमध्ये मिसळावे-रेल्वे मंत्रालयातील सूत्रांनुसार गेल्या महिनाभरात असे सहा-सात हजार कर्मचारी आपापल्या कामावर रुजू झाले आहेत. लवकरच सर्व कर्मचारी त्यांच्या मूळ ड्युटीवर परत जातील, अशी अपेक्षा आहे. अगदीच अपवादात्मक परिस्थिती वगळता यातून कोणालाही सूट दिली जाणार नाही, असेही या सूत्रांनी स्पष्ट केले.रेल्वेचे महाव्यवस्थापक व त्याहून वरचे अधिकारी जेव्हा रेल्वेने प्रवास करतात तेव्हा त्यांचा मोठा राजेशाही थाट असतो. त्यांच्यासाठी संबंधित गाडीला ऐशारामी ‘सलून’ किंवा खास ‘एक्झिक्युटिव्ह क्लास’चा डबा जोडला जातो.परंतु अधिका-यांनी ही छानछोकी बंद करावी आणि वरिष्ठ अधिका-यांनी रेल्वेच्या नियमित स्लीपर व थ्री-टियर डब्यांमधून प्रवास करून प्रवाशांमध्ये मिसळावे, असा फतवा रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी काढला आहे.
रेल्वेतील व्हीआयपी संस्कृती ३६ वर्षांनी निघाली मोडीत, कर्मचारी केवळ आॅफिसपुरते : अधिका-यांच्या सरंजामी राहणीला चाप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 09, 2017 3:33 AM