नवी दिल्ली : २०२०-२०२१ या आर्थिक वर्षात ४४ प्रादेशिक पक्षांकडे २२४९.२५ कोटी रुपयांची मालमत्ता होती तर २०२१-२०२२ या वर्षात ३७ प्रादेशिक पक्षांकडे ३०००.६२ कोटी रुपयांची मालमत्ता होती. ही माहिती या पक्षांनी निवडणूक आयोगाला कळविली होती, असे असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स (एडीआर) या संस्थेने आपल्या अहवालात म्हटले आहे.
या अहवालात म्हटले आहे की, २०२०-२१ या आर्थिक वर्षात १० प्रादेशिक पक्षांकडे १९५९.३५१ कोटी रुपयांची असलेली मालमत्ता २०२१-२२ या वर्षात २९०९.१८६ कोटी रुपये झाली. म्हणजे या संपत्तीत ४८.४८ टक्क्यांनी वाढ झाली. २०२०-२१ या कालावधीत समाजवादी पक्षाकडे सर्वाधिक ५६१.४६ कोटी रुपयांची मालमत्ता होती. त्यात १.२३ टक्क्यांनी वाढ होऊन ती २०२१-२२ या आर्थिक वर्षात ५६८.३६९ कोटी रुपये झाली. तर भारत राष्ट्र समितीची संपत्ती २०२०-२१मध्ये ३१९.५५ कोटी रुपये व २०२१ व २०२२मध्ये ५१२.२४ कोटी रुपये इतकी झाली.
बिजद, जद (यू)च्या मालमत्तेत लक्षणीय वाढ२०२०-२१ व २०२१-२२ या कालावधीत द्रमुक, बिजद, जद(यू) या पक्षांची मालमत्ता ९५ टक्क्यांपेक्षा अधिक प्रमाणात वाढली. त्यात द्रमुकची २४४.८८ टक्के, बिजदची १४३.९२ टक्के, जद (यू)ची ९५.७८ टक्क्यांनी मालमत्ता वाढली. आपची एकूण मालमत्ता २०२०-२१ व २०२१-२२ या आर्थिक वर्षात ७१.७६ टक्क्यांनी वाढली. २०२०-२१मध्ये २१.८२ कोटी रुपये असलेली मालमत्ता २०२१-२२मध्ये ३७.४७७ कोटी रुपये झाली.
२०२१-२२मध्ये पक्षांवर ७४ कोटी रुपयांचे कर्ज २०२०-२१ या वर्षात प्रादेशिक पक्षांनी आपल्यावर ५४.०६३५ कोटींचे तर २०२१-२२ या आर्थिक वर्षात ३७ प्रादेशिक पक्षांनी ७४.१८७३ कोटी रुपयांचे कर्ज असल्याचे आयोगाला कळविले आहे. १० प्रादेशिक पक्षांच्या २०२०-२१मध्ये कर्जाच्या रकमेत २०२१-२२मध्ये ४२.४१ टक्के वाढ होऊन ती ७२.६१८ कोटी झाली आहे. २०२१-२२मध्ये तेलुगु देसम पार्टीवर सर्वाधिक म्हणजे ४२.५८४ कोटी रुपयांचे कर्ज होते.
२०२०-२१ व २०२१-२२ या कालावधीत बिजद व आपवर कर्जांमध्ये अनुक्रमे १४८१.४० टक्के व २२२.५० टक्के वाढ झाली. जनता दल (एस) व एजेएसयूवरील कर्जांमध्ये अनुक्रमे ८.२९ व ८.३३ टक्के वाढ झाली.
द्रमुक, तेलुगु देसमच्या संपत्तीत झाली घटपहिल्या दहा प्रादेशिक पक्षांमधील द्रमुक व तेलुगु देसम पार्टी या पक्षांच्या संपत्तीत अनुक्रमे १.५५ टक्के व ३.०४ टक्के घट झाल्याचे दिसून येत आहे. २०२०-२१ व २०२१-२२ या आर्थिक वर्षांमध्ये अण्णा द्रमुक या प्रादेशिक पक्षाच्या मालमत्तेत २६०.१६६ कोटी रुपयांवरून २५६.१३ कोटी रुपये तर तेलुगु देसम पार्टीच्या मालमत्तेत १३३.४२३ कोटी रुपयांवरून १२९.३७२ कोटी रुपयांपर्यंत घट झाल्याचे दिसून येत आहे.
मनसेकडे १५ कोटी रुपयांचे भांडवल२०२१-२२ मध्ये समाजवादी पक्षाने ५६८.०३७ कोटी रुपयांचे सर्वाधिक भांडवल (कॅपिटल) घोषित केले. भारत राष्ट्र समितीने ५०२.५५१ कोटी तर बिजद ४७३.०६ कोटींचे भांडवल घोषित केले. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने सर्वांत कमी म्हणजे १५.८२४ कोटींचे भांडवल असल्याचे जाहीर केले.