लखनऊ : उत्तर प्रदेश पोलिसांच्या दळणवळण विभागातील निरोप्या शिपायांच्या ६२ रिक्त जागा भरण्यासाठी तब्बल ९३,५०० अर्ज आले असून त्यापैकी ५० हजारांहून अधिक अर्जदार पदवीधर, २८ हजार पदव्युत्तर पदवीधर तर ३,७०० चक्क पीएचडीधारक आहेत.या रिक्त जागा भरण्यासाठी १२ वर्षांनंतर प्रथमच जाहिरात देऊन अर्ज मागविण्यात आले. अर्ज करण्याची मुदत १६ आॅगस्ट रोजी संपली. या पदावर नेमल्या जाणाऱ्या व्यक्तीचे काम खात्याचे टपाल आणि निरोप एका कार्यालयातून दुसºया कार्यालयात पोहोचविणे असे आहे. भरती नियमांनुसार या पदासाठी शैक्षणिक अर्हता इयत्ता पाचवी उत्तीर्ण अशी आहे.बेसुमार बेरोजगारीमुळे बाहेर रोजगाराच्या संधी नसल्याने हजारो उच्चशिक्षित उमेदवारांनीही शिपायांच्या या पदासाठी अर्ज केले आहेत. पूर्णवेळ सरकारी नोकरी व महिना २किमान २० हजार रुपये पगार एवढयासाठी हे उच्चशिक्षित तरुण चतुर्थश्रेणीची नोकरी करण्यास तयार आहेत. एकूण ९३,५०० अर्जदारांमध्ये इयत्ता पाचवी ते आठवीपर्यंत शिक्षण झालेले फक्त ७,४०० अर्जदार आहेत. बाकी सर्व किमान शैक्षणिक अर्हतेहून कितीतरी जास्त शिकलेले आहेत. त्यापैकी अनेकांनी एमबीए केलेले आहे तर काही बीटेकही झालेले आहेत.पोलिसांच्या संबंधित विभागातील एका वरिष्ठ अधिकाºयाने सांगितले की, पूर्वी या पदासाठी अर्ज करणाºयाने सायकल चालविता येते, असे स्वसाक्ष्यांकित हमीपत्र देणे पुरेसे होते. परंतु आता एवढ्या मोठ्या संक्येने उच्चशिक्षितांचे अर्ज आल्याने त्यांना चाळणी लावण्यासाठी कोणती आणि कशी चाचणी घ्यायची हे ठरविण्यात येत आहे.अतिरिक्त पोलीस महासंचालक (टेलिकॉम) पी. के. तिवारी यांनी सांगितले की, किमान शैक्षणिक अर्हतेहून जास्त शिकलेले आहेत म्हणून आम्ही कोणाचाही अर्ज प्राथमिक फेरीत फेटाळणार नाही. उलट एवढे शिकलेले कर्मचारी खात्याला मिळणे चांगले आहे. त्यांच्याकडून इतर कामेही करून घेतली जाऊ शकतील. ज्यांच्याकडे तांत्रिक कौशल्य आहे त्यांना शिपाई पदावरून लवकर वरची जागा मिळू शकेल.बहुसंख्य उमेदवार चांगले शिकलेलेबहुसंख्य उमेदवार चांगले शिकलेले असल्याने या वेळी प्रथमच या पदासाठी लेखी परीक्षा घेण्याचा आमचा विचार आहे, असे सांगून तिवारी म्हणाले की, परीक्षा पारदर्शी पद्धतीने व्हावी यासाठी हे काम बाहेरच्या संस्थेस देण्याचा विचार आहे.
पोलीस शिपायाच्या नोकरीसाठी ३,७०० पीएचडीधारक अर्जदार! ६२ जागांसाठी ९३ हजार अर्ज
By ऑनलाइन लोकमत | Published: September 03, 2018 12:48 AM