अहमदाबाद : २००८ मध्ये गुजरातमधील अहमदाबाद येथे झालेल्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणातील ३८ दोषींना फाशीची, तर ११ दोषींना आजन्म कारावासाची शिक्षा विशेष न्यायालयाने सुनावली आहे, तर अन्य २८ आरोपींची निर्दोष मुक्तता केली. साखळी बॉम्बस्फोटाची भीषण घटना घडल्यानंतर सुमारे १४ वर्षांनी न्यायालयाने हा निकाल दिला आहे.
अहमदाबादमधील साखळी बॉम्बस्फोटांमध्ये ५६ जणांचा मृत्यू व २०० जण जखमी झाले होते. विशेष न्यायालयाचे न्यायाधीश ए. आर. पटेल यांनी अहमदाबाद साखळी बॉम्बस्फोटातील ४९ दोषींना शिक्षा सुनावली आहे. २६ जुलै २००८ रोजी अहमदाबादमध्ये अवघ्या ७० मिनिटांच्या कालावधीत २१ भीषण साखळी बॉम्बस्फोट झाले. सरकारी वकील अरविंद पटेल यांनी सांगितले की, ३८ आरोपींना भारतीय दंड संहितेच्या कलम ३०२ (हत्या करणे) व १२० ब (गुन्हेगारी स्वरूपाचा कट आखणे) या कलमांद्वारे तसेच बेकायदेशीर कृत्ये प्रतिबंधक कायदा (यूएपीए), तर अन्य ११ आरोपींना यूएपीए कायद्याच्या विविध तरतुदींद्वारे दोषी ठरविण्यात आले.
या दोषी व्यक्तींना विशेष न्यायालयाने २.८५ लाख रुपये व अन्य एकाला २.८८ लाख रुपयांचा दंड ठोठावला. अहमदाबादमधील साखळी बॉम्बस्फोटात मरण पावलेल्यांच्या वारसदारांना प्रत्येकी एक लाख रुपये, गंभीर जखमी झालेल्यांना प्रत्येकी ५० हजार रुपये व किरकोळ जखमी झालेल्यांना प्रत्येकी २५ हजार रुपये भरपाई देण्याचा आदेश विशेष न्यायालयाने दिला. फाशी सुनावलेल्या दोषींमध्ये सफदर नागोरी, कयुमुद्दीन कापडिया, झाहीद शेख, शमसुद्दीन शेख आदींचा समावेश आहे. न्याय संस्थेच्या इतिहासातील दुर्मीळ घटना सरकारी वकील अरविंद पटेल यांनी सांगितले की, याआधी एका खटल्यात २६ दोषींना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती. मात्र, अहमदाबाद साखळी बॉम्बस्फोट खटल्यात ३८ दोषींना फाशी सुनावण्यात आली. भारतीय न्याय संस्थेच्या इतिहासातील ही अतिशय दुर्मीळ घटना आहे.नऊ न्यायाधीशांकडून खटल्याचे कामकाजअहमदाबाद साखळी बाॅम्बस्फोट खटला नऊ वेगवेगळ्या न्यायाधीशांनी चालविला. या खटल्याचे कामकाज सर्वप्रथम न्या. बेला त्रिवेदी यांनी पाहिले. त्यांच्याच न्यायालयात बॉम्बस्फोटातील आरोपींवर १५ फेब्रुवारी २०१० रोजी आरोपपत्र दाखल करण्यात आले. न्या. बेला त्रिवेदी आता सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीश आहेत. ज्यांनी निकाल दिला ते विशेष न्यायाधीश ए. आर. पटेल यांच्यासमोर या खटल्याची सुनावणी १४ जून २०१७पासून सुरू झाली.चार आरोपींवर अद्याप खटला सुरू नाहीअहमदाबाद साखळी बॉम्बस्फोटप्रकरणी आणखी चार आरोपींना कालांतराने अटक करण्यात आली होती. मात्र, त्यांच्यावरील खटल्याचे कामकाज अद्याप सुरू झालेले नाही, असे एका सरकारी वकिलाने सांगितले.
दाेषींमध्ये मुंबई, पुणे, जळगावचे रहिवासी
दोषींमधील मोहम्मद अकबर, फजले रहमान, आसिफ शेख हे पुण्याचे, अफझर उस्मानी, मोहम्मद आरिफ हे मुंबईचे, तर तौसिफ खान पठाण हा जळगावचा मूळ रहिवासी आहे. आजन्म कारावासाची शिक्षा झालेल्यांमध्ये मोहम्मद सादिक शेख (मुंबई), अनिक खालिद सैय्यद (पुणे), तर निर्दोष मुक्तता झालेल्यांमध्ये मोहम्मद झाकिर (ठाणे), मुबीन शेख, मोहम्मद मन्सूर (पुणे) यांचा समावेश आहे.