ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २९ - भारतीय लष्कराने बुधवारी रात्री नियंत्रण रेषा ओलांडून दहशतवादी तळांवर हल्ले केले. सुमारे ४ तास चाललेल्या या कारवाईत पाकिस्तान लष्कराच्या नऊ सैनिकांसह किमान ३८ दहशतवादी ठार झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. भारतीय लष्कराचे डीजीएमओ लेफ्टनंट जनरल रणबीर सिंग यांनी गुरुवारी सकाळी पत्रकारपरिषद घेऊन ही माहिती दिली.
गुप्तचरांकडून मिळालेल्या ठोस माहितीच्या आधारावर ही कारवाई करण्यात आली. पाकिस्तानी लष्करालाही या कारवाईची माहिती दिल्याचे भारतीय लष्कराच्या डीजीएमओंनी सांगितले. हे दहशतवादी भारताच्या हद्दीत घुसून हल्ला करण्याच्या तयारीत होते.
दहशतवादी आणि त्यांना पाठिंबा देणा-यांच्या विरोधात हे हल्ले होते अशी माहिती लेफ्टनंट जनरल रणबीर सिंग यांनी दिली. आता ही कारवाई संपली असल्याचे त्यांनी सांगितले.
आणखी वाचा
आपल्या भूमीचा दहशतवादी कारवायांसाठी वापर करु देऊ नका असे वारंवार पाकिस्तानला सांगितल्यानंतरही त्याचा काहीही उपयोग झाला नाही. काहीही परिस्थितीत फरक पडला नाही असे डीजीएमओनी सांगितले.
या कारवाई दरम्यान भारताच्या बाजूला कोणतीही जिवीतहानी झाली नाही. नियंत्रण रेषा ओलांडून हे दहशतवादी भारतात घुसण्याच्या तयारीत होते. गुप्तचरांकडून मिळालेल्या ठोस माहितीच्या आधारावर ही कारवाई करण्यात आली असे डीजीएमओनी सांगितले. २००३ च्या शस्त्रसंधी करारानुसार पाकिस्तानला या कारवाईची माहिती देण्यात आली.
राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, उपराष्ट्रपती हमीद अन्सारी, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग, जम्मू-काश्मीरचे राज्यपाल आणि मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांना भारतीय लष्कराने या सर्जिकल स्ट्राईक्सची माहिती दिली.