नवी दिल्ली - जगण्यासाठी अनेकांना संघर्ष करावा लागतो. आर्थिक परिस्थिती बिकट असल्याने अनेक अडचणींना तोंड द्यावं लागतं. पण यातचही अनेक जण हार न मानता आपल्या जिद्दीच्या जोरावर संकटावर मात करतात. अशीच एक हृदयस्पर्शी घटना आता समोर आली आहे. आपल्या लेकरांच्या शिक्षणासाठी धडपड आणि अपार कष्ट करणाऱ्या एका बापमाणसाची गोष्ट समोर आली आहे. घर तुटलं, पत्नी सोडून गेली पण त्याने हार नाही मानली. रिक्षालाच आपलं घर बनवून तो आता मुलांना शिक्षण देत आहे. गणेश साहू असं या 38 वर्षीय व्यक्तीचं नाव आहे.
ज्यांच्याकडे आपल्या मुलांसाठी डोक्यावर छप्पर नाही पण तरीही ते आपल्या मुलांचं आयुष्य सुखकर करण्यासाठी झटत आहेत. आपल्या मुलांचं पालनपोषण करता यावं, त्यांचं पोट भरता यावं म्हणून ते रिक्षा चालवण्याचं काम करतात. यासोबतच मुलांना देखील स्वत:च शिकवतात. भास्कर डॉट कॉमने दिलेल्या माहितीनुसार, गणेश साहू यांना दोन मुलं आहेत. ते आधी एका छोट्याशा झोपडीमध्ये राहत होते. मात्र अतिक्रमणामध्ये त्यांची झोपडी तुटली. ज्यानंतर ते बेघर झाले. आता रिक्षाच त्यांच्यासाठी सर्वकाही आहे.
रिक्षालाच बनवलं आपलं घर
गणेश साहू यांनी रिक्षालाच आपलं घर केलं असून ते आपल्या दोन्ही मुलांसोबत तिथेच राहतात आणि रिक्षा चालवून त्यांचं पोट भरतात. घर नसल्याने त्यांची पत्नी देखील त्यांना आणि दोन्ही मुलांना सोडून निघून गेली. अनेक समस्यांचा त्यांना सध्या सामना करावा लागत आहे. मात्र तरीदेखील ते दु:खी झालेले नाहीत. त्यांनी आशा सोडलेली नाही. ते आपल्या मुलांसाठी खूप प्रयत्न करत असून त्यांना उत्तम शिक्षण देता यावं. त्यांचं आयुष्य सुखी व्हावं म्हणून कष्ट करत आहेत.
लेकरांच्या शिक्षणासाठी करतोय धडपड
गणेश यांना सात वर्षांचा अरूण नावाचा तर 9 वर्षांची गंगा नावाची मुलगी आहे. ते एकटेच या दोन्ही मुलांचा उत्तम सांभाळ करत आहेत. गणेश साहू यांची आर्थिक परिस्थिती ही अत्यंत बेताची आहे. त्यामुळे ते दोन्ही मुलांना शाळेत पाठवू शकत नाहीत. फी भरण्यासाठी देखील त्यांच्याकडे पुरेसे पैसे नाहीत. पण तरी ते निराश झाले नाहीत. ते स्वत: आपल्या मुलांना शिकवण्याचा छोटासा प्रयत्न करत आहेत. रिक्षा चालवून आल्यानंतर ते मुलांना वेळ देतात आणि शिकवतात.