नवी दिल्ली : आपल्या पायलटांचे उड्डाण परवाने कायम राहावेत, यासाठी अनेक विमान वाहतूक कंपन्या ए-३८० या सुपरजम्बो प्रवासी विमानांची रिकामी उड्डाणे करीत आहेत. या विमानात कोणीही प्रवासी नसतात आणि ते कुठेही जात नाहीत. फक्त उड्डाण करून हँगरमध्ये परतात.
कोरोना विषाणूच्या साथीचा सर्वाधिक फटका नागरी विमान वाहतुकीला बसला आहे. त्यातच आंतरराष्ट्रीय नियम विमान वाहतूक कंपन्यांच्या बोकांडी बसले आहेत. आंतरराष्ट्रीय नागरी उड्डयन संस्थेच्या मार्गदर्शक नियमावलीनुसार, पायलटांना आपला उड्डाण परवाना कायम ठेवण्यासाठी मागील ९० दिवसांत किमान तीन वेळा विमान उडविणे आणि उतरविणे आवश्यक आहे. त्यामुळे कंपन्यांना पायलटांचे परवाने टिकविण्यासाठी रिकामी विमाने उडवावी लागत आहेत.
दक्षिण कोरियातील एशियाना एअरलाइन्सच्या प्रवक्त्याने सांगितले की, ४९५ आसन क्षमतेचे एसई ए-३८० हे सुपरजम्बो विमान आम्ही मे महिन्यात रोज तीन तास रिकामेच उडवायचो. या विमानाचे टेक आॅफ आणि लँडिंग हे महाखर्चिक आहे. मात्र आम्हाला आमच्या पायलटांचे परवाने टिकविणेही आवश्यक आहे. पायलटांचे परवाने गमावणे कंपनीला परवडत नाही. त्यामुळे ही उड्डाणे करावीच लागली.