ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. १ - चलनातून ५०० आणि एक हजार रुपयांच्या नोटा बाद करण्यात आल्यानंतर जनधन खात्यांमध्ये मोठ्या प्रमाणात रोख रकमा जमा करण्यात आल्या. गेल्या पंधरा दिवसांत त्यातून ३,२८५ कोटी रुपये काढून घेण्यात आले. या खात्यांमध्ये ७ डिसेंबरअखेर विक्रमी ७४,६१० कोटी रुपये जमा झाले होते व त्यानंतर त्यातून पैसे काढण्यात आले. दरम्यान २८ डिसेंबर रोजी या खात्यांत ७१,०३७ कोटी रुपये जमा होते, असे अर्थमंत्रालयाने दिलेल्या माहितीत म्हटले आहे. जनधन खात्यांचा गैरवापर रोखण्यासाठी ३० नोव्हेंबरपासून या खात्यांतून दरमहा १० हजार रुपयेच काढता येतील, असे बंधन घालण्यात आले होते, तरीही गेल्या दोन आठवड्यांत त्यातून ३,२८५ कोटी रुपये काढून घेण्यात आले. जनधन खात्यांमध्ये जास्तीत जास्त ५० हजार रुपये भरण्याची मर्यादा होती. ९ नोव्हेंबर रोजी अशा सुमारे २५.५ कोटी खात्यांमध्ये ४५,६३६.६१ कोटी रुपये होते. नोटाबंदीचा निर्णय झाल्यानंतर महिनाभराने जनधन खात्यांमध्ये पैसे जमा करण्याचा वेग वाढला व त्यात २८,९७३ कोटी रुपये भरले गेले. शून्य जमा पैशांवर सुरू करण्यात आलेल्या या जनधन योजनेत आजही २४.१३ टक्के खात्यांत काहीही जमा नाही. जनधन योजनेतील बँक खात्यांमध्ये सर्वात जास्त पैसे भरले गेले व त्यानंतर पश्चिम बंगाल व राजस्थानमधल्या खात्यांमध्ये हे पैसे जमा झाल्याची माहिती समोर आली होती.