लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : इस्लामिक स्टेट आॅफ इराक अँड सिरियाने (इसिस) तीन वर्षांपूर्वी अपहरण केलेले ३९ भारतीय वायव्य मोसुलमधील बदुश तुरुंगात असावेत, असे परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी रविवारी म्हटले. २४ जुलै रोजी इराकचे परराष्ट्रमंत्री इब्राहीम अल जाफरी भारत दौऱ्यावर येत असून त्यावेळी ते या अपहृतांबद्दल ताजी माहिती कदाचित आणतील, असेही त्या म्हणाल्या. या अपहृत भारतीय पुरुषांच्या कुटुंबियांनी रविवारी स्वराज यांची येथे भेट घेतली. त्यावेळी त्या बोलत होत्या. अपहृतांत बहुसंख्य पंजाबमधील आहेत. परराष्ट्र राज्य मंत्री व्ही. के. सिंह यांनी अपहृतांबद्दल माहिती गोळा केली आहे. इसिसच्या ताब्यातून मोसूल सोडवून घेण्यात आले आहे अशी घोषणा इराकच्या पंतप्रधानांनी केल्यानंतर सिंह यांना त्या देशात पाठवण्यात आले होते. त्या भारतीयांना रुग्णालयाच्या कामांवर ठेवण्यात आले होते व नंतर त्यांना शेतात हलवण्यात आले. नंतर त्यांना पश्चिम मोसुलमधील बदुश तुरुंगात ठेवण्यात आले, असे गुप्तचर सूत्रांचा हवाला देऊन विश्वसनीय अधिकाऱ्याने सांगितल्याचे स्वराज म्हणाल्या. बदुश येथे इराकची सशस्त्र दले आणि इसिसमध्ये संघर्ष सध्या सुरू आहे. पूर्व मोसुल पूर्णपणे इसिसच्या ताब्यातून सोडवून घेण्यात आलेला आहे. इमारती सध्या स्वच्छ करून घेतल्या जात आहेत व नागरिकांना त्यात बाँब किंवा इतर स्फोटके असतील म्हणून जाऊ दिले जात नाही, असे त्या म्हणाल्या. भारतीयांना तुरुंगात ठेवले गेल्यापासून त्यांच्याबद्दल काही माहिती नाही, असे व्ही. के. सिंह म्हणाले. बदुशमधील लढाई संपली की नव्याने माहिती उपलब्ध होईल. या भारतीयांचा ठावठिकाणा शोधण्यास मदत करू शकतील अशा देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांशी मी बोलले असल्याचेही स्वराज म्हणाल्या.
अपहृत ३९ भारतीय बहुधा बदुश तुरुंगात
By admin | Published: July 16, 2017 11:38 PM