नवी दिल्ली - लहान मुलांमध्ये ऑनलाईन गेमची क्रेझ पाहायला मिळत आहे. पण मुलाचं मोबाईलवर गेम खेळणं एका वडिलांना चांगलंच महागात पडलं आहे. त्यांच्या बँक खात्यातून तब्बल 39 लाख रुपये अचानक गायब झाले आहेत. आग्रा येथे राहणारा एक मुलगा वडिलांच्या मोबाईलमध्ये गेम खेळत होता, त्याच दरम्यान त्याने वडिलांच्या खात्यातून 39 लाख रुपये उडवले आहेत. हा धक्कादायक प्रकार वडिलांना समजताच त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आग्रा येथील खंदोली भागातील रहिवासी असलेल्या एका निवृत्त सैनिकाने महिनाभरापूर्वी सायबर रेंजमध्ये अर्ज दिला होता, ज्यामध्ये त्यांनी फसवणूक करून त्यांच्या खात्यातून 39 लाख रुपये काढण्यात आल्याचं सांगितलं होतं. एवढी मोठी रक्कम कशी काढण्यात आली हे त्यांना कळलच नाही. याबाबत त्यांनी बँकेशीही संपर्क साधला, जिथून त्यांना सर्वप्रथम रक्कम पेटीएमवरून कोडा पेमेंटमध्ये गेली, त्यानंतर ही रक्कम सिंगापूरच्या बँक खात्यात ट्रान्सफर करण्यात आली.
ज्या बँक खात्यात पैसे ट्रान्सफर केले गेले ते सिंगापूरमधील क्रॉफ्टन कंपनीच्या मालकीचे आहे. हीच कंपनी बॅटल ग्राउंड्स मोबाईल इंडिया या नावाने ऑनलाईन गेम फीड करते, जी भारतातही खूप लोकप्रिय झाली. या संदर्भात कंपनीविरुद्ध आयटी एक्ट आणि फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आग्रा शहरातील बँक खात्यातून पैसे आपोआप ट्रान्सफर होण्याची ही पहिलीच घटना नाही. याआधीही मोबाईलवर गेम खेळताना बँक खात्यातून मोठी रक्कम कापल्याची अनेक प्रकरणे समोर आली आहेत.
हरिपरवात परिसरातील एका व्यापाऱ्याच्या खात्यातून 30 लाख रुपयेही कापण्यात आले. त्यांचा मुलगा वडिलांच्या मोबाईलमध्ये गेम खेळायचा. याशिवाय अनेक व्यापाऱ्यांच्या खात्यातूनही पैसे कापण्यात आले असून, त्याबाबत व्यापाऱ्यांनी पोलिसांकडे तक्रार केली होती, त्याबाबत तपास सुरू आहे. एसएसपी सुधीर कुमार सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलांना हे माहीत नाही की ऑनलाईन गेममुळे ऑनलाईन पेमेंटचे व्यवहार आजकाल खूप सोपे झाले आहेत. अनेक वेळा खेळातील सुविधा वाढवण्यासाठी पैशांचीही मागणी केली जाते. जेव्हा मुले गेममधील सुविधा वाढवण्यासाठी ओके करतात तेव्हा रक्कम आपोआप वजा होऊ लागते. त्यामुळेच खात्यातून मोठी रक्कम कापली जाते. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.