११ मुख्यमंत्र्यांसह ३९९ नेत्यांनी बदलला पक्ष; २०१४ पासून भाजपाचा काँग्रेसला धक्का
By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2024 05:19 PM2024-03-27T17:19:29+5:302024-03-27T17:20:44+5:30
अलीकडेच माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, मिलिंद देवरा, बाबा सिद्दिकी यांच्यासारख्या काँग्रेस नेत्यांनी पक्षाला रामराम केला.
नवी दिल्ली - निवडणुकीच्या रिंगणात प्रत्येक पक्ष एकमेकांना चीतपट करण्यासाठी प्रयत्न करत असतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भाजपाला देशात नवी उभारी मिळाली. २०१४ मध्ये नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यापासून आतापर्यंत ३९९ दिग्गज काँग्रेस नेत्यांनी भाजपाचा झेंडा हाती घेतला. त्यात ११ मुख्यमंत्र्यांचाही समावेश आहे. २४ मार्चला हरियाणातील काँग्रेस नेते आणि माजी मंत्री नवीन जिंदाल यांनी काँग्रेसला रामराम केला.
नवीन जिंदाल हे भाजपात येताच त्यांना कुरुक्षेत्र मतदारसंघातून भाजपाने उमेदवारी घोषित केली. हिमाचल प्रदेशमध्येही भाजपाने ६ बंडखोर नेत्यांना पक्षात घेतले. २०१४ ते २०२१ या काळात सर्वात जुन्या काँग्रेस पक्षातून तब्बल ३९९ दिग्गज नेत्यांनी पक्ष सोडला. त्यात १७७ खासदार आणि आमदारांचा समावेश आहे. मध्य प्रदेशात ज्योतिरादित्य शिंदे आणि किमान २२ आमदारांनी २०२० मध्ये भाजपात सहभागी होण्याचा निर्णय घेत काँग्रेस पक्ष सोडला.
भाजपानं शिंदे यांना केंद्रीय मंत्रिपद दिले आणि मध्य प्रदेशात कमलनाथ यांचे सरकार पाडले. त्याचवर्षी सुरेश पचौरी यांनी अनेक माजी आमदार, खासदारांसह पक्ष सोडला. महाराष्ट्रात २०१९ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी माजी मुख्यमंत्री नारायण राणे आणि त्यांचे सहकारी हर्षवर्धन पाटील यांनी भाजपात प्रवेश केला. अलीकडेच माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, मिलिंद देवरा, बाबा सिद्दिकी यांच्यासारख्या काँग्रेस नेत्यांनी पक्षाला रामराम केला.
उत्तर प्रदेशात माजी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष जगदंबिका पाल आणि रिता बुहुगुणा जोशी, रवी किशन, अमरपाल त्यागी, धीरेंद्र सिंह यांनी २०१४, २०१६, २०१७ या काळात पक्ष सोडला. २०२१ मध्ये जितिन प्रसाद आणि २२ काँग्रेस नेत्यांनी पक्षाला रामराम केला. २०२२ मध्ये आरपीएन सिंह यांनी काँग्रेससोबतचे ३ दशकाचे जुने संबंध तोडले. कर्नाटकात माजी मुख्यमंत्री एसएस कृष्णा यांनीही ५० वर्षाचे काँग्रेससोबतचे संबंध संपवले. पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनीही भाजपात प्रवेश केला. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी आता काहीच दिवस शिल्लक आहेत. भाजपाने यंदा अबकी बार ४०० पारचा नारा दिला आहे. त्यामुळे प्रत्येक राज्यात पक्षांतरेही वाढली आहेत.