नवी दिल्ली – भारतीय औद्योगिक संस्था(IIT)च्या वैज्ञानिकांनी गणितीय मॉडेलच्या आधारे भारतात कोविड १९ च्या दुसऱ्या लाटेत सक्रीय रुग्णांची संख्या १४ ते १८ मे दरम्यान ३८-४८ लाखांपर्यंत पोहचू शकते. ४ ते ८ मेमध्ये कोरोना संक्रमणाचे रुग्ण दिवसाला साडेचार लाखांपर्यंत पोहचण्याची शक्यता आहे. भारतात सोमवारी कोरोना संक्रमित ३ लाख ५२ हजार ९९१ रुग्ण आढळून आले आहेत.
देशात कोरोना महामारीमुळे २ हजार ८१२ लोकांचा जीव गेला आहे. सध्या देशात उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या २८ लाख १३ हजार ६५८ पर्यंत पोहचली आहे. आयआयटी कानपूर आणि हैदराबादच्या वैज्ञानिकांनी सूत्र नावाचं मॉडेलचा वापर करत मे च्या पंधरवड्यात सक्रीय रुग्णांच्या संख्येत १० लाखांनी वाढ होऊ शकते असा अंदाज वर्तवला आहे. नव्या अंदाजानुसार या आकडेवारीत सुधारणा झाली आहे. मागील आठवड्यात ११ ते १५ मे मध्ये कोरोना कहर वाढू शकतो असं सांगितलं जात होतं. मे च्या अखेरपर्यंत कोरोना रुग्ण संख्येत घट होईल असंही सांगण्यात आलं आहे.
या महिन्याच्या सुरुवातीला वैज्ञानिकांनी वर्तवलेल्या अंदाजानुसार देशात १५ एप्रिलच्या दरम्यान कोरोना रुग्णांची संख्या टॉपवर असेल सांगितलं होतं. परंतु हे खरं झालं नाही. आयआयटी कानपूरमध्ये कॉम्प्युटर आणि विज्ञान अभियांत्रिकीचे प्राध्यापक मनिंदर अग्रवाल यांनी सांगितले की, नव्या अंदाजानुसार मे महिन्यात रुग्णसंख्या वाढू शकते. संक्रीय रुग्णांची संख्या १४-१८ मे मध्ये शिखर गाठणार आहे. दिवसांला साडेतीन लाखापासून साडेचार लाखापर्यंत नवीन रुग्ण आढळतील.
आता घरातही मास्क घालण्याची वेळ
देशात सलग पाचव्या दिवशी रुग्णसंख्येचा उच्चांक नोंदवण्यात आला आहे. केंद्र सरकारच्या नीती आयोगातील आरोग्य विभागातील सदस्य डॉ. व्ही. के. पॉल यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे. कोरोनाच्या या गंभीर काळात विनाकारण घराबाहेर पडू नका. एवढेच नव्हे, तर घरातील सदस्यांनी कुटुंबांसोबत घरबसल्या मास्क घाला. मास्क घालणे अतिशय महत्त्वाचे आहे. याशिवाय कोणालाही घरी बोलावू नका, असे पॉल यांनी म्हटले आहे.