IAF Plane Crash : भारतीय सैन्याच्या शौर्याचे जगभरात नेहमीच कौतुक होत असतं. भारतीय सैन्याने अनेक धाडसी मोहिमा करत शत्रूंना शह दिला आहे. मात्र काही कारवायांमध्ये काही सैनिकांना यश आलं नाही, पण त्यांनी प्रयत्न सोडले नाहीत. याचाच प्रत्यय आता आला आहे. सुमारे ५६ वर्षांपूर्वी हिमाचल प्रदेशमध्येही एक अपघात झाला होता. भारतीय हवाई दलाच्या एका विमानाला रोहतांग पासजवळ भीषण अपघात झाला. त्यात विमानात तब्बल १०२ लोक होते. अपघातानंतर बेपत्ता लोकांची खूप शोधाशोध करण्यात आली. पण सर्व मृतदेह सापडले नाहीत. पण लष्कराने हार मानली नाही आणि आज तब्बल ५६ वर्षांनंतर चार मृतदेह सापडले आहेत. ही भारतातील सर्वात लांब शोध मोहिमांपैकी एक मानली जाते.
सुमारे ५६ वर्षांपूर्वी हिमाचल प्रदेशमध्ये ही दुर्घटना घडली होती. रोहतांग पास येथे भारतीय हवाई दलाच्या AN-१२ विमानाला अपघात झाला होता. या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या ४ जणांचे मृतदेह नुकतेच बाहेर काढण्यात आले आहेत. भारतातील सर्वात जास्त काळ चाललेल्या शोध मोहिमेपैकी हे एक मोहिम आहे. भारतीय लष्कराच्या डोगरा स्काउट्स आणि तिरंगा माउंटन रेस्क्यूच्या जवानांनी हे मृतदेह बाहेर काढले आहेत अशी माहिती लष्कराच्या अधिकाऱ्यांनी दिली.
ही घटना ७ फेब्रुवारी १९६८ साली घडली होती.डबल इंजिन असलेले टर्बोप्रॉप विमान १०२ प्रवाशांसह चंदीगडहून लेहला जात होते. मात्र मधेच ते खराब झाले आणि रोहतांग पासवर कोसळले. २००३ मध्ये, अटल बिहारी वाजपेयी इन्स्टिट्यूट ऑफ माउंटेनियरिंगच्या गिर्यारोहकांनी त्या विमानाचा सांगाडा शोधून काढला होता. यानंतर शोध मोहिमेत भारतीय लष्कर विशेषत: डोग्रा स्काऊट्स तैनात करण्यात आले. डोग्रा स्काउट्सने २००५, २००६, २०१३ आणि २०१९ मध्ये विविध मोहिमा राबवत शोधकार्य केलं होतं.
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्या ठिकाणी हा अपघात झाला तिथे पोहोचणे फारच कठीण होते. २०१९ पर्यंत तिथून फक्त पाच मृतदेह बाहेर काढता आले होते. आता चंद्रभागा पर्वत मोहिमेत आणखी चार मृतदेह सापडले आहेत, ज्यामुळे मृतांच्या कुटुंबीयांना नवी आशा मिळाली आहे. सापडलेल्या मृतदेहांपैकी तिघांची ओळख पटली आहे. मलखान सिंग, हवालदार नारायण सिंग आणि कारागीर थॉमस चरण अशी त्यांची नावे असल्याचे समोर आलं आहे.
मृतदेहांजवळ सापडलेल्या कागदपत्रांवरून त्यांची ओळख पटली आहे. मात्र चौथ्या मृतदेहाची ओळख अद्याप पटलेली नाही. क्राफ्टमॅन थॉमस चरण हे केरळमधील पथनामथिट्टा जिल्ह्यातील एलांथूरचे रहिवासी होते. त्याच्या कुटुंबियांना याची माहिती पाठवण्यात आली आहे. कॉन्स्टेबल नारायण सिंह हे लष्कराच्या वैद्यकीय पथकात काम करायचे. ते उत्तराखंडमधील गढवालमधील चमोली तहसीलमधील कोलपाडी गावचे रहिवासी होते. दरम्यान, ही शोध मोहीम १० ऑक्टोबरपर्यंत सुरू राहणार असल्याचे लष्कराने सांगितले.