बंगळुरू : कर्नाटकमधील काँग्रेस विधिमंडळ पक्षाच्या शुक्रवारी झालेल्या बैठकीस अनुपस्थित राहिलेले त्या पक्षाचे चार आमदार भाजपामध्ये नक्की प्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. यापैकी दोन आमदारांना काँग्रेस पक्षांतरबंदी कायद्याच्या आधारे कारणे दाखवा नोटीस बजावणार असून, अन्य दोन आमदारांबद्दल पक्षाने सबुरीचे धोरण स्वीकारले आहे.काँग्रेसचे आमदार रमेश जर्किहोली व महेश कुमतल्ली विधिमंडळ पक्षाच्या बैठकीस मुद्दामहून अनुपस्थित राहिले याचे पुरावे उपलब्ध असून, त्यांचे सदस्यत्व रद्द का करण्यात येऊ नये, अशी विचारणा करणारी नोटीस पक्षाकडून बजावली जाईल. उमेश जाधव, बी. नागेंद्र या अन्य दोन आमदारांवर काय कारवाई करायची याचा निर्णय काही दिवसांनी घेतला जाईल. उमेश जाधव हे भाजपामध्ये जाणार हे जवळजवळ निश्चित आहे. कलबुर्गी लोकसभा मतदारसंघात मल्लिकार्जुन खरगे यांच्या विरोधात जाधव यांना उमेदवारी दिली जाईल, अशी चर्चा आहे. काँग्रेस विधिमंडळ पक्षाच्या बैठकीस येऊ शकत नसल्याचे जाधव यांनी दिलेले पत्र ही केवळ तांत्रिक बाबींची पूर्तता आहे.कर्नाटकमध्ये जनता दल (एस) व काँग्रेस आघाडीचे सरकार पाडण्यासाठी भाजपा प्रयत्नशील असल्याचे आरोप झाले होते. घोडेबाजार टाळण्यासाठी राज्यातील भाजपाच्या १०४ आमदारांना गुरगाव येथील एका रिसॉर्टमध्ये काही दिवसांपासून ठेवण्यात आले आहे.कर्नाटकमध्ये काही ठिकाणी दुष्काळी स्थिती असून, त्याची पाहणी व उपाययोजनांसाठी आमदारांनी आपापल्या मतदारसंघात परत जावे, असे त्यांना कर्नाटक भाजपा प्रदेशाध्यक्ष बी.एस. येडीयुरप्पा यांनी सांगितले आहे.>असंतुष्ट आमदारांसाठी मंत्रीपद सोडण्याची तयारीकर्नाटक काँग्रेसमधील असंतुष्ट आमदारांचा राज्य मंत्रिमंडळात समावेश करण्यासाठी पक्षाचे सर्व विद्यमान मंत्री आपल्या पदाचा राजीनामा देण्यास तयार आहेत, असे त्या पक्षाचे ज्येष्ठ नेते व मंत्री डी.के. शिवकुमार यांनी म्हटले आहे. राज्यात निर्माण झालेल्या प्रत्येक राजकीय पेचप्रसंगातून काँग्रेसला ते सहीसलामत बाहेर काढतात, अशी ख्याती आहे. ते म्हणाले की, आम्ही पक्षाचे निष्ठावान कार्यकर्ते आहोत. धरमसिंग सरकार असताना काही कारणाने मला मंत्रिमंडळात घेण्यात आले नव्हते. सिद्धरामय्या यांच्या कारकीर्दीतही मला मंत्रिपद मिळाले नव्हते. आमच्यासाठी पद नव्हे, तर पक्ष महत्त्वाचा आहे.
४ काँग्रेस आमदार भाजपात जाणार?, अन्य दोघांबद्दल सबुरीचे धोरण
By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2019 6:13 AM