श्रीनगर: जम्मू-काश्मीरमध्ये गेल्या 24 तासांमध्ये सुरक्षा दलाचे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चार चकमकी झाल्या आहेत. यातील एक चकमक शोपिया जिल्ह्यातल्या इमाम भागात अजूनही सुरू आहे. या ठिकाणी एका घरात दोन-तीन दहशतवादी लपल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली आहे. तर बांदिपोरातल्या चकमकीत लष्कर-ए-तोयबाच्या 2 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. यामध्ये लष्कर-ए-तोयबाचा टॉप कमांडर अली भाईचा समावेश आहे. तो मूळचा पाकिस्तानचा रहिवासी होता. बारामुल्ला जिल्ह्यात गुरुवारी झालेल्या चकमकीत दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आलं. तर शोपिया जिल्ह्यात एका दहशतवाद्याला ठार करण्यात सुरक्षा दलांना यश आलं. जम्मू-काश्मीरमध्ये गेल्या 24 तासांमध्ये झालेल्या चार चकमकींमध्ये आतापर्यंत पाच दहशतवाद्यांना कंठस्नान घातलं गेलं आहे. या कारवाईत एका अधिकाऱ्यासह तीन जवान जखमी झाले. बारामुल्लातील कलंतरा भागात दोन दहशतवाद्यांना ठार करण्यात आल्याची माहिती सुरक्षा दलाचे प्रवक्ते राजेश कालिया यांनी दिली. अद्याप चकमक सुरू असून यात एक अधिकारी आणि दोन जवान जखमी झाल्याची माहिती त्यांनी दिली. चकमकीत जखमी झालेल्या जवानांवर बादामीबागमधील लष्कराच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दहशतवादी लपल्याची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलानं आसपासचा परिसर ताब्यात घेत सर्च ऑपरेशन सुरू केलं. यावेळी दहशतवाद्यांनी सुरक्षा दलाच्या जवानांवर गोळीबार केला. या गोळीबाराला जवानांनी चोख प्रत्युत्तर दिलं. यानंतर सुरक्षा दलाचे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये काही वेळ चकमक सुरू होती. काल बारामुल्लामध्ये सर्च ऑपरेशन सुरू असताना दहशतवाद्यांनी जवानांवर ग्रेनेड हल्ला केला. यानंतर काही वेळातच सोपोरमध्ये दहशतवाद्यांनी सीआरपीएफच्या तळाला लक्ष्य केलं. सुदैवानं या हल्ल्यात जीवितहानी झाली नाही. यानंतर या भागातील सुरक्षा वाढवण्यात आली.