लोकमत न्यूज नेटवर्कराजौरी : जम्मू-काश्मीरच्या राजौरी जिल्ह्यात दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत लष्कराचे दोन कॅप्टन आणि दोन जवान शहीद झाले, तर अन्य दोघे जखमी झाले. लपून बसलेले दहशतवादी पळून जाऊ नये, -म्हणून सुरक्षा दलांना चारही बाजूंनी घेरले. त्यानंतर दोन्ही बाजूंकडून सुमारे ९ तास चकमक झाली.
पोलिस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास बाजीमल परिसरात दहशतवादी लपल्याची माहिती पोलिसांनी मिळाली होती. त्यानंतर सर्च ऑपरेशन राबविले होते. दहशतवाद्यांच्या गोळीबारात सुरुवातीला एक कॅप्टन दर्जाचे अधिकारी शहीद झाले, तर अन्य एक कॅप्टन आणि दोन जवान जखमी झाले होते. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले, परंतु उपचारादरम्यान त्यांचाही मृत्यू झाला.
५ दिवसांपूर्वी झाले ५ दहशतवादी ठारपाच दिवसांपूर्वी कुलगाम येथे एका घरात लपलेल्या ५ दहशतवाद्यांना ठार करण्यात सुरक्षा दलाला यश आले होते. त्यावेळी घटनास्थळावरून मोठा शस्त्रसाठा जप्त केला होता. तसेच मोठा हल्ला करण्याचा त्यांचा डाव उधळण्यात आला.
तीन दिवसांपासून सुरू हाेती कारवाईसुरक्षा दलाला मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, दहशतवादी कारवाईसंदर्भात १९ नोव्हेंबरपासून राजौरी जिल्ह्यातील गुलाबगड जंगलात शोधमोहीम सुरू केली होती. त्यानंतर बुधवारी ही चकमक झाली.
दहशतवाद्यांशी संबंध; डॉक्टर, पोलिससह चार कर्मचारी बडतर्फ
जम्मू : जम्मू - काश्मीर प्रशासनाने बुधवारी दहशतवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोपावरून डॉक्टर आणि एका पोलिसासह चार सरकारी कर्मचाऱ्यांना बडतर्फ केले. श्रीनगर येथील एसएमएचएस रुग्णालयातील सहायक प्राध्यापक निसार - उल - हसन, कॉन्स्टेबल अब्दुल मजीद भट, प्रयोगशाळा कर्मचारी अब्दुल सलाम राथेर आणि शिक्षण विभागाचे शिक्षक फारुख अहमद मीर यांच्यावर गुन्हा दाखल केला.