जम्मू काश्मीर - पुलवामा येथील लस्सीपुरा भागात पहाटेपासून सुरक्षा यंत्रणा आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरु आहे. चकमकीत 4 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात भारतीय जवानांना यश आलं असून दहशतवाद्यांकडून अनेक हत्यारे जप्त करण्यात आल्याची माहिती आहे.
लष्कर ए तोएबाच्या 4 दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले आहे. मृत दहशतवाद्यांकडून 2 एके रायफल्स, 1 एसएलआर आणि 1 पिस्तुल जप्त करण्यात आली असून परिसरामध्ये लष्कराकडून शोधमोहीम सुरुच आहे. दहशतवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत 3 जखमी झाले असून त्यांच्यावर नजीकच्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
दोन दिवसांपूर्वी दहशतवाद्यांकडून पुलवामाच्या त्राल परिसरात गोळीबार करण्यात आला होता. यामध्ये एका सामान्य नागरिकाला दहशतवाद्याने गोळी मारल्याने तो गंभीर जखमी झाला होता. या घटनेनंतर संपूर्ण परिसरातील नागरिकांमध्ये दहशतीचं वातावरण निर्माण झालं होतं. मंजूर अहमद हजाम असं या जखमी नागरिकाचे नावं आहे.
महिनाभरापूर्वी दहशतवाद्यांकडून पुलवामा येथे सीआरपीएफच्या जवानांवर हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्यांमध्ये सीआरपीएफचे 40 जवान शहीद झाले होते. सीआरपीएफ जवानांचा हा ताफा जम्मूवरुन श्रीनगरला जात होता. त्यावेळी दहशतवाद्यांकडून त्यांच्यावर हल्ला करण्यात आला. या दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेने घेतली होती. यानंतर भारतीय हवाई दलाकडून एअर स्ट्राईक करत बालकोट परिसरातील जैश ए मोहम्मदच्या दहशतवादी तळांना टार्गेट करण्यात आलं होतं.