दंतेवाडा : छत्तीसगडच्या बस्तर क्षेत्रात सुरक्षा दलाशी झालेल्या चकमकीत ४ नक्षली ठार झाले. मात्र, या धुमश्चक्रीत जिल्हा राखीव दलाच्या (डीआरजी) एका हेडकॉन्स्टेबलचा मृत्यू झाला. चकमकीनंतर घटनास्थळावरून एके-४७ रायफलसह स्वयंचलित शस्त्रे जप्त करण्यात आली.
गुप्त माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलाने नारायणपूर, दंतेवाडा, कोंडागाव व बस्तरच्या पथकांसोबत शुक्रवारी संयुक्त अभियान सुरू केले. शनिवारी सायंकाळी जवान दक्षिण अबूझमाड जंगलात दाखल झाले. तेव्हा नक्षल्यांनी सुरक्षा दलाला लक्ष्य करत गोळीबार केला. नंतर उडालेल्या चकमकीत चार नक्षली ठार झाले तर हेडकॉन्स्टेबल सन्नू करम यांना वीरमरण आले.
एनआयएचे छापे
झारखंडमधील नक्षलवाद्यांशी संबंधित एका प्रकरणाच्या तपासादरम्यान राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) शनिवारी झारखंडच्या प. सिंहभूम जिल्ह्यात नऊ ठिकाणी छापे टाकले.