भोपाळ : मध्यप्रदेशमधील २२ पैकी १३ बंडखोर आमदार काँग्रेसला सोडचिठ्ठी देणार नसल्याचा दावा पक्षाचे वरिष्ठ नेते दिग्विजयसिंह यांनी बुधवारी केला आहे. विधानसभेत कमलनाथ सरकार विश्वासदर्शक ठराव निश्चितच जिंकेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.आम्हीही गप्प बसलेलो नाही किंवा झोपा काढत नसल्याचेही ते म्हणाले. ज्योतिरादित्य शिंदे हे काँग्रेसमधून बाहेर पडले, त्याचप्रमाणे त्या राज्याच्या विधानसभेतील २२ काँग्रेस आमदारांनी आपल्या पदाचे राजीनामे राज्यपालांकडे पाठविले आहेत. या घटनांच्या पार्श्वभूमीवर दिग्विजयसिंह म्हणाले की, ज्योतिरादित्य शिंदे यांना मध्यप्रदेशचे उपमुख्यमंत्रीपद देण्याची तयारी काँग्रेस नेतृत्वाने दाखविली होती. मात्र, त्याऐवजी आपल्या निष्ठावंताला हे पद द्यावे असे ज्योतिरादित्य यांचा आग्रह होता. राज्यसभेच्या निवडणुकांसाठी शिंदे यांना काँग्रेसकडून उमेदवारी मिळण्याची शक्यता होती. मात्र, आता अतिमहत्त्वाकांक्षी नेत्याला नरेंद्र मोदी-अमित शहा हेच कॅबिनेट मंत्रीपद देऊ शकतात असे ते म्हणाले.सरकार अस्थिर करण्याचा मोदींचा प्रयत्न : राहुलमध्यप्रदेशमध्ये लोकशाही मार्गाने निवडून आलेले कमलनाथ सरकार अस्थिर करण्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रयत्न चालविला आहे, असा आरोप काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी केला. ते म्हणाले की, तेलाच्या किमती ३५ टक्क्यांनी घसरल्याच्या घटनेकडे मोदींचे बहुधा दुर्लक्ष झाले असावे. पंतप्रधानांनी तेलाच्या किमती कमी झाल्याचा फायदा देशातील जनतेला मिळवून दिला पाहिजे. मात्र, त्यावेळेस मोदी हे मध्यप्रदेशमधील कमलनाथ सरकार अस्थिर करण्याच्या प्रयत्नांत दंग होते.
मध्यप्रदेशमध्ये २२ पैकी १३ बंडखोर आमदार काँग्रेस सोडणार नाहीत
By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2020 4:14 AM