डेहराडून: उत्तराखंडमधील चमोली जिल्ह्यातील माणा गावात बीआरओच्या शिबिरात हिमस्खलनामुळे बर्फाखाली दबलेल्या पन्नास कामगारांना बाहेर काढण्यात यश आले आहे. मात्र त्यापैकी चार जणांचा शनिवारी मृत्यू झाला. उर्वरित पाच कामगारांना वाचविण्यासाठी बचाव पथक शर्थीचे प्रयत्न करीत आहे.
माणा आणि बद्रीनाथ दरम्यान बीआरओ शिबिराजवळ शुक्रवारी पहाटे हिमस्खलन झाले. त्यानंतर आठ कंटेनर आणि शेडमध्ये ५५ कामगार दबले गेले. शुक्रवारी रात्रीपर्यंत ३३ जणांची सुटका करण्यात आली. शुक्रवारी बर्फवृष्टीमुळे बचावकार्यात अडथळे आले आणि रात्री हे ऑपरेशन थांबविले होते.
जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी एन.के. जोशी यांनी सांगितले की, हवामान स्वच्छ झाल्यावर, माणा येथे तैनात लष्कर आणि आयटीबीपी जवानांनी सकाळी बचावकार्य पुन्हा सुरू केले. लष्कराच्या प्रवक्त्यांनी सांगितले की, सहा हेलिकॉप्टर बचाव कार्य करीत आहेत. पन्नास मजुरांना बाहेर काढण्यात यश आले आहे.
मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी केले हवाई सर्वेक्षण
मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी या क्षेत्राचे हवाई सर्वेक्षण केले. उपचारासाठी नेण्यात येत असलेल्या जखमी मजुराशीही संवाद साधला. ते म्हणाले की, पंतप्रधानांनी फोनवरून अडकलेल्या कामगारांना सुरक्षित बाहेर काढण्यास राबविलेल्या बचाव कार्याची माहिती घेतली.