नवी दिल्ली - ओडिशामध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. राउरकेला स्टील प्लान्ट (Rourkela Steel Plant) मधून वायू गळती झाल्याची भयंकर घटना घडली आहे. या दुर्घटनेत चार कर्मचाऱ्यांच्या मृत्यू झाला आहे. तर विषारी वायूच्या संपर्कात आल्याने अनेकांची प्रकृती बिघडली आहे. काहींची प्रकृती गंभीर आहे. उपचारासाठी त्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, राउरकेला स्टील प्लान्टच्या कोल केमिकल डिपार्टमेंटमध्ये बुधवारी सकाळी साडे नऊच्या दरम्यान ही दुर्घटना घडल्याचं म्हटलं जात आहे. कोल डिपार्टमेंटमध्ये अचानक वायू गळती होऊ लागली. कर्मचाऱ्यांनी सतर्क होऊन प्लान्टबाहेर जाण्याचा प्रयत्न केला. मात्र याचवेळी अनेकजण विषारी वायूच्या संपर्कात आले. त्यामध्ये आतापर्यंत चार जणांचा मृत्यू झाला असून सहा जणांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळत आहे. गंभीर व्यक्तींवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
उत्तर प्रदेशच्या प्रयागराजमधील फुलपूर येथील इंडियन फार्मर्स फर्टिलायझर्स कोऑपरेटिव्ह लिमिटेडच्या (IFFCO) प्लांटमध्ये काही दिवसांपूर्वी मोठा अपघात झाला होता. इफ्फ्कोच्या प्लान्टमधील युरिया उत्पादन युनिटमध्ये अमोनिया गॅसची गळती झाली. यामुळे दोन अधिकाऱ्यांचा मृत्यू झाला. तर 15 कर्मचाऱ्यांची प्रकृती बिघडली. त्यांना उपचारांसाठी जवळच्या रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आलं होतं.
उत्तर प्रदेशातल्या IFFCOच्या प्लान्टमध्ये वायू गळती; दोन अधिकाऱ्यांचा मृत्यू
फुलपूरमधील इफ्फ्कोच्या प्लान्टमध्ये अमोनिया वायूची गळती सुरू झाली. युरियाची निर्मिती करणाऱ्या विभागांमध्ये हा प्रकार घडला. त्यावेळी रात्र पाळीतील कर्मचाऱ्यांचं काम सुरू होतं. साडे अकराच्या सुमारास वायू गळती सुरू झाली. त्यामुळे एकच गोंधळ उडाला. कर्मचारी बाहेरच्या दिशेनं पळू लागले. वायू गळतीमुळे सहाय्यक व्यवस्थापक व्ही. पी. सिंह आणि उपव्यवस्थापक अभयनंदन यांचा मृत्यू झाला. तर 15 कर्मचारी बेशुद्ध पडले होते.