Doda Gunfight : गेल्या काही दिवसांपासून जम्मू-काश्मीरमधील शांतता बिघडवण्याचा प्रयत्न दहशतवादी सातत्याने करत आहेत. पुन्हा दशतवाद्यांनी डोकं वर काढून हल्ले करायला सुरुवात केली आहे. जम्मू-काश्मीरमधील डोडा जिल्ह्यात दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत लष्कराच्या अधिकाऱ्यासह चार सुरक्षा जवान शहीद झाले आहेत. लष्कराच्या अधिकाऱ्यांनी मंगळवारी ही माहिती दिली. त्यामुळे लष्कराच्या आणखी चार जवानांना वीरमरण आलं आहे.
जम्मू-काश्मीरच्या डोडा जिल्ह्यातील जंगलाच्या भागात सोमवारी रात्री भारतीय लष्काराची दहशतवाद्यांसोबत चकमक सुरु झाली होती. मात्र दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत गंभीर जखमी झालेल्या अधिकाऱ्यासह चार जवानांचा मंगळवारी पहाटे रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. राष्ट्रीय रायफल्स आणि जम्मू-काश्मीर पोलिसांच्या स्पेशल ऑपरेशन ग्रुपच्या जवानांनी डोडा शहरापासून ५५ किमी अंतरावर असलेल्या देसा वनक्षेत्रातील धारी गोटे उरारबागी येथे लपलेल्या दहशतवाद्यांची संयुक्त शोध मोहीम सुरू केली होती. त्यानंतर रात्री जवानांनी हल्ला केल्यानंतर चकमक सुरु झाली.
२० मिनिटांपेक्षा जास्त काळ चाललेल्या या गोळीबारात एका अधिकाऱ्यासह चार लष्करी जवान आणि एक पोलिस जखमी झाले होते. जखमींना तात्काळ रुग्णालयात नेण्यात आले. त्यांची प्रकृती चिंताजनक होती आणि त्यापैकी चौघांचा आता मृत्यू झाला आहे, अशी माहिती लष्करी अधिकाऱ्यांनी दिली. त्यानंतर आता सुरक्षा दलांनी परिसराला वेढा घातला असून घटनास्थळी अतिरिक्त सुरक्षा दल पाठवण्यात आले आहे.
राष्ट्रीय रायफल्स आणि जम्मू आणि काश्मीर पोलिसांच्या विशेष ऑपरेशन ग्रुपच्या जवानांनी संध्याकाळी सुमारे ७.४५ मिनिटांनी शोध मोहीम सुरू केली तेव्हा चकमक सुरू झाली. गुप्त माहितीच्या आधारे, डोडाच्या उत्तरेकडील सामान्य भागात लष्कर आणि पोलिसांची संयुक्त कारवाई सुरू होती. रात्री ९ वाजताच्या सुमारास दहशतवाद्यांचे ठिकाण कळताच गोळाबीर सुरु करण्यात आला होता, असेही लष्करी अधिकाऱ्यांनी सांगितले.
दरम्यान, या घटनेनंतर संपूर्ण परिसरात सर्च ऑपरेशन सुरू आहे. काश्मीर टायगर्स या दहशतवादी संघटनेने डोडा हल्ल्याची जबाबदारी घेतली आहे. ही संघटना जैश-ए-मोहम्मदची एक शाखा आहे. याच संघटनेने कठुआ येथे लष्कराच्या ताफ्यावर झालेल्या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली होती.