अगरतळा/इम्फाळ : कोरोना विषाणूची लागण झालेला त्रिपुरातील दुसरा रुग्णही शनिवारी पूर्णपणे बरा झाल्यानंतर आता ईशान्य भारतातील कोरोना विषाणूमुक्त राज्यांची संख्या ४ झाली आहे. यामध्ये त्रिपुरासह मणिपूर, अरुणाचल प्रदेश, सिक्कीम या राज्यांचा समावेश आहे.ईशान्य भारतातील आसाम या राज्यामध्ये कोरोना विषाणूचा संसर्ग झालेले १५ रुग्ण असून, त्याशिवाय मेघालयमध्ये ११ व मिझोराममध्ये एक रुग्ण आहे. त्याशिवाय नागालँडच्या दिमापूर येथील एका बाधित महिलेवर गुवाहाटी वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात १२ एप्रिलपासून उपचार सुरू आहेत.त्रिपुराचे मुख्यमंत्री विप्लवकुमार देव यांनी सांगितले की, त्रिपुरामधील दुसरा व अखेरचा ‘कोविड- १९’चा रुग्ण उपचारांनंतर पूर्णपणे बरा झाला असून त्याला शनिवारी घरी पाठविण्यात आले. त्यामुळे हे राज्य कोरोना विषाणूमुक्त झाले आहे. डॉक्टर व अन्य वैद्यकीय कर्मचारी यांनी अहोरात्र केलेले परिश्रम तसेच जनतेने दिलेले सहकार्य यामुळे ही गोष्ट साध्य करता आल्याचे विप्लवकुमार देव म्हणाले.पूर्णपणे बरा झालेला दुसरा रुग्ण उत्तर प्रदेशमधील मूळ रहिवासी असून तो त्रिपुरा राज्य रायफल दलामध्ये जवान आहे. त्याच्यावर गोविंद वल्लभ पंत वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयामध्ये उपचार सुरू होते. आता यापुढे तो घरातच १४ दिवस क्वारंटाइन राहणार आहे. त्रिपुरातील पहिला रुग्ण असलेली महिला पूर्णपणे बरी झाल्यानंतर तिला १५ एप्रिल रोजी घरी जाण्याची परवानगी देण्यात आली होती. आरोग्य खात्याची जबाबदारी तेथील मुख्यमंत्र्यांकडेच आहे.ब्रिटनहून इम्फाळला परतलेल्या एका २३ वर्षे वयाच्या महिलेला कोरोनाचा संसर्ग झाल्याचे वैद्यकीय चाचणीतून सिद्ध झाले होते. उपचारानंतर पूर्णपणे बरी झालेली ती ईशान्य भारतातील पहिली रुग्ण ठरली.>आतापर्यंत पाच राज्यांनी घेतला मोकळा श्वासदेशात आतापर्यंत आढळलेल्या रुग्णांची संख्या २५ हजारावर गेली असतानाच ५ राज्ये ‘कोविड-१९’ या भयंकर संसर्गजन्य रोगापासून मूक्त होत त्यांनी मोकळा श्वास घेतला आहे. देशामध्ये सर्वात आधी गोवा हे राज्य कोरोना विषाणूच्या संसर्गापासून मुक्त झाले. त्यानंतर मणिपूरचा क्रमांक लागला. अरुणाचल प्रदेश, सिक्कीम, त्रिपुरा ही राज्येदेखील नंतर कोरोना विषाणूच्या संसर्गापासून मूक्त झाली. ईशान्य भारतातील सर्व म्हणजे आठही राज्यांत शनिवारी एकही नवा रुग्ण आढळून आलेला नाही.
ईशान्य भारतातील ४ राज्ये संसर्गमुक्त!
By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2020 3:52 AM