शिमला - हिमाचल प्रदेशातील सोलन येथे रविवारी रात्री भीषण दुर्घटना घडली. सोलन येथील चार मजली इमारत कोसळल्याने 14 जणांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत 28 जणांना ढिगाऱ्याखालून बाहेर काढलं आहे. आणखीही काही जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. या इमारतीत 42 जण उपस्थित होते. त्यातील 30 जण भारतीय जवान होते. दुर्घटनेत मृतांपैकी 13 जण भारतीय जवान आहेत. सध्या घटनास्थळी स्थानिक प्रशासन आणि एनडीआरएफ टीमचं रेस्क्यू ऑपरेशन सुरु होतं.
नाहन-कुमारहट्टी मार्गावरील ही चार मजली इमारत पावसामुळे कोसळली. या इमारतीत रेस्टॉरंटदेखील होते. सोलन येथील अधिकाऱ्यांनी सांगितले की, या दुर्घटनेत 42 लोक अडकले होते. अनेक जण या गंभीर जखमी आहेत त्यांच्यावर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. जखमींमध्ये 18 जवानांचा समावेश आहे. भारतीय लष्कर, सीआरपीएफ आणि पोलिसांकडूनही घटनास्थळी शोधमोहिम सुरु आहे.
माहितीनुसार हिमाचल प्रदेशातील कुमारहट्टी मार्गावर एका हॉटेलमध्ये ही दुर्घटना घडली आहे. भारतीय जवान त्या मार्गावरुन प्रवास करत असताना जेवण करण्यासाठी ते त्या हॉटेलला थांबले होते. ज्यावेळी ही दुर्घटना घडली त्यावेळी जवानांसोबत त्यांचे कुटुंबही हजर होतं. सतत पडणाऱ्या पावसामुळे घटनास्थळी रेस्क्यू करण्यासाठी अनेक अडचणी निर्माण होत आहेत.
हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांनी या घटनेवर शोक व्यक्त केला असून पुढील काही तासात रेस्क्यू ऑपरेशन संपेल असं सांगितले आहे. तसेच या दुर्घटनेची चौकशी केली जाणार असून लोकांना वाचविण्यासाठी प्रशासन तत्पर आहे असं सांगितले.