श्रीनगर : जम्मू-काश्मीरमध्ये गेल्या चोवीस तासांत श्रीनगर आणि कुलगाममध्ये घडलेल्या दोन वेगवेगळ्या चकमकीत सुरक्षा दलाने एका पाकिस्तानी अतिरेक्यासह चार अतिरक्यांना ठार केले, असे एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. ठार झालेल्या अतिरेक्यांत शकूर फारुख लंगू याचा समावेश आहे. पोलिसांच्या माहितीनुसार २० मे रोजी सौरा भागात सीमा सुरक्षा दलाच्या दोन जवानांवरील हल्ल्यात त्याचा समावेश होता. सीमा सुरक्षा दलाच्या एका जवानाकडून हिसकावलेली एके रायफल चकमकीच्या ठिकाणी सापडली.श्रीनगर जिल्ह्यातील झुनीमार भागात अतिरेकी असल्याच्या खबर मिळाल्यानंतर पोलीस आणि केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या संयुक्त पथकाने या भागाची चोहोबाजूंनी नाकेबंदी करून शोधमोहीम सुरू केली. शोधमोहिमेदरम्यान दडी मारून बसलेल्या दहशतवाद्यांना त्यांच्या कुटुंबियांमार्फत शरणगती पत्करण्याचे आवाहन करण्यात आले; परंतु दहशतवाद्यांनी सुरक्षा पथकावर बेछूट गोळीबार केल्याने याठिकाणी दोन्ही बाजूंनी चकमक उडाली. यात तीन अतिरेकी ठार झाले. दोघांची ओळख पटली असून, त्यांची नावे शकूर फारुख आणि शाहीद अहमद भट, अशी आहेत. तिसºया दहशतवाद्याची ओळख अद्याप पटली नाही, असे अधिकाºयाने सांगितले.तीनही दहशतवादी हिज्बुल मुजाहिदीन आणि इस्मालिक स्टेट जम्मू-काश्मीरशी संबंधित होते. सुरक्षा दलाने जूनमध्ये ३१ दहशतवादांचा खात्मा केला असून, यावर्षी आतापर्यंत १०५ दहशतवादी ठार झाले आहेत, असे अधिकाºयाने सांगितले.शनिवारी कुलगाम जिल्ह्यात जैश-ए-मोहम्मदचा अतिरेक्याला ठार मारल्यानंतर चोवीस तासांच्या आत श्रीनगरमध्ये रविवारी चकमक उडाली.कुलगाम येथील चकमकीत मारल्या गेलेला दहशतवादी पाकिस्तानी असून, त्याचे नाव तयब ऊर्फ इम्रान भाई ऊर्फ गाझी बाबा आहे. तो जैश-ए-मोहम्मद या संघटनेचा आॅपरेशन कमांडर आणि अद्ययावत स्फोटक यंत्रे बनविण्यात निपुण आणि शार्पशूटरही होता.>आंतरराष्टÑीय सीमेलगत गोळीबारपाकिस्तानी सैनिकांनी रविवारी पूंछ आणि कठुआ जिल्ह्यातील प्रत्यक्ष नियंत्रण रेषा (एलओसी) आणि आंतरराष्टÑीय सीमेलगतच्या चौक्या आणि गावांत गोळीबारासोबत तोफगोळ्यांचा मारा केला. यात भारताच्या बाजूने कोणतीही जीवित हानी वा नुकसान झाले नाही.रविवारी सकाळी ६.१५ वाजता पाकिस्तानने बालाकोटमधील एलओसीलगतच्या भागात गोळीबार सुरू केला. भारतीय जवानही जोरदार पलटवार करून तडाखेबाज उत्तर देत आहे. शनिवारी रात्री कठुआ जिल्ह्यातील हिरानगरमधील आंतरराष्टÑीय सीमेलगतच्या करोल मत्राई भागातील चौक्या आणि गावांवर गोळीबार केला. सीमापार गोळीबारामुळे या भागातील नागरिकांत घबराट पसरली.
काश्मिरात २४ तासांत ४ दहशतवाद्यांचा खात्मा
By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2020 3:16 AM