नवी दिल्ली : २0१५ या वर्षात ४ हजार कोट्यधीश भारतीयांनी विदेशात जाऊन राहणे पसंत केले. विदेशात स्थायिक झालेल्या या कोट्यधीश भारतीयांची मिळकत प्रत्येकी १0 लाख डॉलर म्हणजेच ६.७ कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. जागतिक पातळीवर विदेशात जाऊन स्थायिक होणाऱ्या उच्च संपदाधारकांत भारतीयांचा क्रमांक चौथा लागतो. ‘न्यू वर्ल्ड वेल्थ रिपोर्ट’मध्ये ही माहिती देण्यात आली आहे. रिपोर्टमध्ये म्हटले की, २0१५ मध्ये ४ हजार अतिधनाढ्य भारतीयांनी आपले निवासस्थान बदलले. फ्रान्समधील सर्वाधिक १0 हजार धनाढ्य नागरिक दुसऱ्या देशात स्थायिक झाले आहेत. देशाबाहेर जाणाऱ्या कोट्यधीशांमुळे भारत आणि चीनला चिंता करण्याचे कोणतेही कारण नाही, असे या रिपोर्टमध्ये नमूद करण्यात आले आहे. रिपोर्ट म्हणतो की, हे दोन्ही देश जेवढे कोट्यधीश बहिर्गमनामुळे गमावत आहेत, त्यापेक्षा जास्त कोट्यधीश नव्याने निर्माण होत आहेत. देशांतर्गत जीवनमानात सुधारणा झाल्यास देशाबाहेर गेलेले कोट्यधीश पुन्हा मायदेशी परतू शकतील, असेही रिपोर्टमध्ये नमूद करण्यात आले आहे.
४ हजार कोट्यधीश झाले विदेशवाशी!
By admin | Published: March 31, 2016 2:27 AM