ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 2 - पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 8 नोव्हेंबर रोजी नोटाबंदी निर्णयाची घोषणा केल्यानंतर सोन्याची रेकॉर्डतोड विक्री झाल्याचं समोर आहे. फक्त 48 तासांत तब्बल चार टन सोनं विकलं गेलं, ज्याची किंमत तब्बल 1,250 कोटींहूनही जास्त आहे. डायरेक्टरेट ऑफ सेंट्रल एक्साईज इंटेलिजन्सने (डीजीसीईआय) केलेल्या सर्वेक्षणात ही माहिती समोर आली आहे. 8 नोव्हेंबर रोजीच मोठ्या प्रमाणात सोनं विकण्यात आलं, यामध्ये मोठ्या प्रमाणात काळा पैसा पांढरा करण्याचं काम केलं गेलं असा दावा अधिका-यांनी केला आहे.
दिल्लीमधील एका मोठ्या ज्लेलर्सने फक्त एका दिवसात 200 किलो सोनं विकलं. पण त्याच्या एक दिवस आधी त्याने फक्त 40 ग्राम सोनं विकलं होतं. देशभरातील सोने व्यापा-यांची चौकशी केल्यानंतर 400 सोनारांनी 20 कोटींची करचोरी केल्याचं समोर आलं आहे. चौकशी पुर्ण होईपर्यंत हा आकडा 100 कोटीपर्यंत जाण्याची शक्यता आहे.
गेल्याच आठवड्यात डीजीसीईआयने सर्वात सोन्याचे मोठे व्यापारी जोयाकुल्लासवर छापेमारी केली. एप्रिलपासून ते नोव्हेंबरपर्यंत कंपनीने 5.7 टन सोन्याचा व्यवहार केल्याचं यावेळी निदर्शनास आलं. या सोन्याची किंमत 1500 कोटीहून जास्त आहे. कंपनीने एक टक्का अबकारी कर बुडवल्याने करचोरीचा आरोप आहे. कंपनीला 16 कोटींच्या करचोरीप्रकरणी नोटीस पाठवण्यात आली होती अशी माहिती एका वरिष्ठ अधिका-याने दिली आहे. छापेमारीनंतर कंपनीकडून 10 कोटींचा कर जमा करण्यात आला आहे.
डीजीसीईआयने दिल्लीमधील पीपी ज्वेलर्सचीही चौकशी केली, आणि 4.5 कोटींचा केंद्रीय अबकारी कर भरायला सांगितला. एप्रिल ते नोव्हेंबर दरम्यान कंपनीने 450 कोटींच्या सोन्याचा व्यवहार केला आहे. नोटीस मिळाल्यानंतर कंपनीकडून 2 कोटींचा टॅक्स जमा करण्यात आला आहे. हा आकडा सोने व्यापा-यांच्या रेकॉर्डमधून घेण्यात आला आहे. याशिवाय मोठ्या प्रमाणात सोन्याची तस्करी करण्यात आली आहे. गेल्याच महिन्यात चेन्नईत आयकर विभागाने एका ठिकाणी छापेमारी करत 170 किलो सोनं जप्त केलं होतं.