साखरझोपेत ४ गावे उद्ध्वस्त; वायनाडमध्ये दरडी कोसळून, पुरामुळे हाहाकार, मदतकार्य सुरु

By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2024 05:23 AM2024-07-31T05:23:17+5:302024-07-31T05:24:51+5:30

केरळच्या वायनाडमध्ये ४ गावे ओरबाडली, घरे उद्ध्वस्त झाली, कुटुंब संपले अन् आक्रोश सुरू, फुगलेल्या नद्यांनी मार्ग बदलल्याने घरे, वाहने, मोठमोठे दगडही वाहिले, हिरव्यागार नंदनवनाचा झाला चिखल

4 villages destroyed in kerala wayanad landslides caused havoc relief work started | साखरझोपेत ४ गावे उद्ध्वस्त; वायनाडमध्ये दरडी कोसळून, पुरामुळे हाहाकार, मदतकार्य सुरु

साखरझोपेत ४ गावे उद्ध्वस्त; वायनाडमध्ये दरडी कोसळून, पुरामुळे हाहाकार, मदतकार्य सुरु

वायनाड (केरळ) : वायनाडमध्ये मंगळवारी मोठ्या प्रमाणात दरडी कोसळल्याने व पुरामुळे हाहाकार उडाला असून, सर्वत्र आक्रोश ऐकायला येत आहे. मुंडक्काई, चूरलमाला, अट्टमाला आणि नूलपुझा या चार गावांना दरड कोसळल्याचा आणि पुराचा मोठा फटका बसला असून, यामुळे येथील घरे वाहून गेली तर काही उद्ध्वस्त झाली. साखरझोपेत असलेल्या लोकांवर आलेल्या या संकटातअनेक जण बेपत्ता झाले असून, नातेवाईक त्यांचा शोध घेण्यासाठी रुग्णालये पालथी घालत आहेत. 

सोमवारपर्यंत नयनरम्य ठिकाण म्हणून ओळखले जात असलेल्या या गावाचे चित्रच दरड आणि पुरामुळे बदलून गेले आहे. पुराच्या पाण्यात वाहून गेलेली वाहने अनेक ठिकाणी झाडांच्या फांद्यावर अन् इकडे तिकडे अडकून पडलेली दिसत आहेत.
फुगलेल्या नद्यांनी आपला मार्ग बदलला असून, पुराचे पाणी गावांमध्ये शिरले आहे. यामुळे आणखी विध्वंस होत आहे. डोंगरावरून मोठमोठे दगड खाली कोसळत असून, ते बचाव कार्यात अडथळे निर्माण करत आहेत.

शोधू कुठे, काहीच कळेना

एका तरुणीने सांगितले की, कुटुंबातील पाचजण बेपत्ता आहेत, यात २ मुले आहेत. माझ्या घरातील लोकांना कोणी रुग्णालयात आणले असेल या आशेने मी येथे आल्याचे तिने सांगितले. मला आता कुठे जायचे, त्यांना कुठे शोधू हे मला काही कळेना. आमची दोन मुलेही बेपत्ता आहे, असे तिने रडत रडत सांगितले. रुग्णालयात एका व्यक्तीला आपल्या भावाचा मृतदेह आढळून आल्याने अंगावर काटे आणणारा आक्रोश केला. यावेळी उपस्थित लोकांनी त्याचे सांत्वन केले.

पुनर्वसनासाठी मदत करा

वायनाड येथे दरड कोसळून मोठी प्राणहानी झाली आहे. या दुर्घटनेचा तडाखा बसलेल्या लोकांना केंद्र सरकारने सर्वतोपरी मदत करावी, अशी मागणी लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी मंगळवारी त्या सभागृहात केली. दुर्घटनाग्रस्तांचा जीव वाचविण्याबरोबरच पुनर्वसनासाठी सरकारने पावले उचलावीत, असेही ते म्हणाले.

मृतदेहांच्या रांगेत ते शोधताहेत ‘आपले’

सध्या येथील आरोग्य केंद्रात मृतदेहांची रांग लागली असून, येथे लोक आपल्या कुटुंबातील कोणी आहे का याचा शोध घेत आहेत. येथे कुटुंबातील व्यक्तींचे मृतदेह पाहून काहींना काळीज हेलवणारा आक्रोश केला तर काहींनी येथे नातेवाइकांचा मृतदेह न सापडल्याने आपले नातेवाइक सुखरूप सापडतील या आशेने नि:श्वास सोडला. अनेक आरोग्य केंद्रात हेच दृश्य दिसले. ढिगाऱ्याखालून आतापर्यंत दोन जणांना जिवंत बाहेर काढण्यात आले असून, सुमारे २५० जणांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे.

अनेक कुटुंबे बेपत्ता

एका स्थानिक अंगणवाडी सेविकेने सांगितले की मी माझ्या काही ओळखीच्या लोकांचा शोध घेत आहेत. यात एका १२ वर्षाच्या मुलीसह चार लोकांचा समावेश आहे. त्यांच्या नातेवाइकांनी मला सांगितले की, त्यांचे संपूर्ण कुटुंब बेपत्ता आहे आणि त्यांचे घरही कोसळले आहे. अबुबकर नावाचा दिव्यांग आपल्या बेपत्ता भाऊ आणि कुटुंबाच्या शोधात हॉस्पिटलच्या एका खोलीतून दुसऱ्या खोलीत भटकत राहिला होता. पावसामुळे तो पत्नीसह बहिणीच्या घरी गेल्याने वाचला आहे.

अरबी समुद्रातील तापमानवाढीने दरडी कोसळताहेत...

अरबी समुद्राच्या तापमानवाढीमुळे घनदाट पावसाळी ढगांची निर्मिती होते. त्यामुळेच केरळमध्ये कमी कालावधीत अतिशय मुसळधार पाऊस पडण्याचा व दरडी कोसळण्याचाही धोका वाढला असल्याचे एका ज्येष्ठ हवामान शास्त्रज्ञाने मंगळवारी सांगितले. कोचीन युनिव्हर्सिटी ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजीतील (सीयूएसएटी) ॲडव्हान्सड् सेंटर फॉर ॲटमॉस्फिअरिक रडार रिसर्चमध्ये कार्यरत असलेले शास्त्रज्ञ एस. अभिलाष यांनी सांगितले की, अरबी समुद्राच्या आग्नेय भागातले तापमान वाढत असून, त्याचा परिणाम केरळ व अन्य काही भागांवर झाला आहे. यासंदर्भात एस. अभिलाष यांच्या संशोधनाचे निष्कर्ष एनपीजे क्लायमेट अँड ॲटमॉस्फिअरिक सायन्स जर्नलमध्ये २०२२ साली प्रसिद्ध झाले होते. भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर मुसळधार पावसाचे प्रमाण वाढले आहे. पश्चिम घाटातील पावसामुळे दरडी कोसळण्याचे प्रमाण वाढणार आहे, असेही संशोधकांनी म्हटले होते. 

आप्तांना दोन लाखांची भरपाई

दुर्घटनेतील जीवितहानीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र शोक व्यक्त केला. या दुर्घटनाग्रस्तांना सर्वतोपरी मदत करण्यात येईल, असे मोदी यांनी मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांना सांगितले. मृतांच्या वारसदारांना प्रत्येकी दोन लाख रुपये तर जखमींना प्रत्येकी ५० हजार रुपयांची भरपाई देण्याची घोषणा मोदी यांनी केली. दरम्यान या बचावकार्यासाठी केरळ सरकारने लष्कराची मदत घेतली आहे.

ढगफुटीने महापूर...

हिमाचल प्रदेशातील कुल्लू जिल्ह्यातील तोश नाला येथे ढगफुटीमुळे आलेल्या महापुरात पूल वाहून गेले. यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. यंथं पुढील काही दिवसांत अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे.

दरड कोसळण्याच्या भीषण घटना

वर्ष    प्रदेश    मृतांची संख्या
१९४८    आसामचा उत्तर-पूर्व भाग    ५०० 
४ ऑक्टोबर १९६८    दार्जिलिंग    १०००
१८ ऑगस्ट १९९८    उत्तराखंडमधील मालपा    ३००
१२ जुलै २०००    मुंबईतील घाटकोपर     ६७
९ नोव्हेंबर २००१    केरळमधील अंबुरी    ३९
१६ जून २०१३    उत्तराखंड, केदारनाथ    ५७००
३० जुलै २०१४    पुणे, माळीण    १५१
६ ऑगस्ट २०२०    केरळ, पेट्टीमुडी    ६५
१८ जुलै २०२१    मुंबई, विक्रोळी, कांजूरमार्ग    ३२
३० जून २०२२    मणिपूर, तुपूल    ५८
१९ जून २०२३    रायगड, ईर्शाळगड    २६
२८ मे २०२४    मिझोराम    १४
१६ जुलै २०२४    कर्नाटकमधील शिरूर    ८
३० जुलै २०२४    केरळमधील वायनाड    १२३
 

Web Title: 4 villages destroyed in kerala wayanad landslides caused havoc relief work started

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.