नवी दिल्ली - देशभरात चोरीच्या अनेक घटना या सातत्याने समोर येत असतात. अनेकदा लोक पोलिसांत तक्रार दाखल करायला घाबरतात. मात्र आता एका 4 वर्षांच्या चिमुकल्याने न घाबरता आपल्या तक्रारीसाठी थेट पोलीस स्टेशन गाठल्याची घटना समोर आली आहे. चिमुकल्याची तक्रार ऐकून पोलीसही चकीत झालेले पाहायला मिळाले. ध्रुव असं या मुलाचं नाव असून त्याच्या सायकलची घंटी चोरीला गेली आहे. घंटी चोरीला गेल्याचं लक्षात येताच ध्रुवने पोलिसांत धाव घेतली.
मिळालेल्या माहितीनुसार, हल्का बस्सी पठाना येथील मुहल्ला पूरा येथे राहणार्या राजन वर्माच्या घराबाहेर उभ्या असलेल्या त्याच्या 4 वर्षाच्या मुलाच्या सायकलची घंटी कोणीतरी चोरली. ध्रुव जेव्हा घराबाहेर पडला तेव्हा त्याने आपली सायकल पाहिली. त्यावेळी सायकलला घंटी नसल्याचं लक्षात आलं. तो धावत घरात गेला आणि ही बाब त्याच्या आई-वडिलांना सांगितली. सायकलची घंटी चोरीला गेल्याने त्याने पालकांसोबत पोलिसांत जाण्यासाठी हट्ट धरला.
4 वर्षांच्या चिमुकल्यानं गाठलं पोलीस स्टेशन
सुरुवातीला ध्रुवला त्याच्या वडिलांनी खूप समजावलं. पण तो ऐकून घ्यायला तयार नव्हता. वडिलांनी अखेर त्याचं म्हणणं मान्य केलं आणि त्याच्यासोबत पोलीस स्टेशनला तक्रार करण्यासाठी गेले. पोलिसांनी ध्रुवचं म्हणणं ऐकून घेतलं आणि त्याला चोर आणि सायकलची घंटी लवकर शोधून काढू असं आश्वासनही दिलं. वडिलांनी घडलेला सगळा प्रकार पोलिसांना सांगितला आणि पोलिसांनी देखील या 4 वर्षांच्या चिमुकल्याला त्याची सायकलची बेल शोधून देण्यात मदत करण्याचं आश्वासन दिलं.
चिमुकल्याचा पोलिसांवर असलेला विश्वास पाहून सर्वांनाच वाटलं आश्चर्य
पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांनी ध्रुवला सायकलची घंटी दिली पण त्यांना अवघ्या चार वर्षांच्या चिमुकल्याचा पोलिसांवर असलेला विश्वास पाहून आश्चर्य वाटलं. पोलिसांवर ध्रुवने दाखवलेला हा विश्वास हा नव्या पीढीसाठी खूप चांगला संदेश असल्याची भावना पोलिसांनी व्यक्त केली आहे. लहान मुलांमध्ये पोलिसांप्रति असलेला आदर आणि विश्वास पाहून सर्वच जण चकीत झाले. तसेच लहान मुलं किती सतर्क असू शकतात हे देखील पाहायला मिळालं आहे. अनेकांनी ध्रुवच्या हुशारीचं कौतुक केलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.