ऑनलाइन लोकमत
बरेली, दि. ३ - डोक्यावर पदर घेतला नाही म्हणून उत्तरप्रदेशमधील बरेली येथे एका पित्याने चार वर्षाच्या मुलीची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. याप्रकऱणी पोलिसांनी जाफर हुसैन याला अटक केली आहे. बरेली येथे जाफर हुसैन, पत्नी व त्यांची मुलगी फरहीन (४ वर्ष) हे तिघे राहतात. शुक्रवारी दुपारी फरहीन आईसोबत जेवण करत असताना जाफर घरी परतला. फरहीनने डोके झाकले नव्हते म्हणून जाफर संतापला व संतापाच्या भरात त्याने फरहीनला जमिनीवर आपटले. यात फरहीनचा घटनास्थळीच मृत्यू झाला. जाफरने मारहाण करताना थांबवण्याचा प्रयत्न करणा-या पत्नीला मारहाण केली. तसेच फरहीनचा मृत्यू झाल्यानंतर तिचा मृतदेह घरातच गाडण्यासाठी तिच्यावर दबाव टाकला होता. याप्रकाराची माहिती समजताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जाफरला अटक केली.