उत्तर प्रदेशातील ग्रेटर नोएडा येथून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. येथे एका चार वर्षाच्या मुलाचा त्याच्या पालकांसमोरच रुग्णालयात मृत्यू झाला. चिमुकल्याच्या घशात चॉकलेट अडकल्याने त्याला श्वास घेण्यास त्रास होत होता. पालकांनी त्याला तातडीने रुग्णालयात नेले. मात्र उपचारादरम्यानच त्यांचा मृत्यू झाला. हे प्रकरण राबुपुरा भागातील आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सानियाल नावाचा 4 वर्षांचा मुलगा रविवारी आजोबांकडे चॉकलेट घेण्यासाठी हट्ट करू लागला. आजोबांनी त्याला चॉकलेट घेण्यासाठी पैसेही दिले. पैसे घेऊन सानियालने जवळच्या दुकानात जाऊन स्वतःसाठी चॉकलेट विकत घेतलं. पण तो जे चॉकलेट खाण्याचा हट्ट करत होता ते त्याच्या जीवावर बेतलं आहे.
सानियालने घरी पोहोचून चॉकलेट खाताच ते त्याच्या घशात अडकलं. त्यामुळे त्याला श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. मुलाची ढासळलेली प्रकृती पाहून पालकांनी त्याला तातडीने रुग्णालयात नेले. मुलाला अजिबात बोलता येत नव्हतं. डोळ्यातून फक्त अश्रू येत होते आणि त्याला वेदना होत होत्या. डॉक्टरांनी तातडीने त्याच्यावर उपचार सुरू केले. मात्र उपचारादरम्यानच मुलाचा मृत्यू झाला.
स्वत:च्या डोळ्यांसमोर तडफडून मुलाचा मृत्यू झाल्याने पालकांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. डॉक्टरांनी मुलाचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला. त्यानंतर सोमवारी सायंकाळी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. सानियाल हा त्याच्या आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा होता. घरात शोकाकुल वातावरण असून कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.