न्यूयॉर्क- अब्जाधीशांच्या यादीत भारत जगात तिसऱ्या स्थानकावर पोहचला आहे. फोर्ब्सच्या अब्जाधीशांच्या यादीत भारताने जर्मनीला मागे टाकत तिसऱ्या क्रमांकावर झेप घेतली आहे. सगळ्यात जास्त अब्जाधीश अमेरिकेत आहेत. तर त्यानंतर चीनचा नंबर लागलो. या लिस्टनुसार भारतात एकुण 19 नवे अब्जाधीश असून भारतातील एकुण अब्जाधीशांची संख्या 121 झाली आहे. गेल्यावर्षी हा आकडा 102 होता. अमेरिकेत सर्वाधिक ५८५ तर दुसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या चीनमध्ये ३७३ अब्जाधीश आहेत. फोर्ब्जने जाहीर केलेल्या अब्जाधीशांच्या या यादीत अॅमेझॉनचे सीईओ जेफ बेझोज 112 अब्ज डॉलर्सच्या संपत्तीसह प्रथम क्रमांकावर आहेत.
मुकेश अंबानी यांची संपत्ती गेल्यावर्षीच्या तुलनेत 16.9 अब्ज डॉलर्सने(1.09 लाख करोड रूपये) वाढली आहे. सध्या त्यांची संपत्ती 40.1 अब्ज डॉलर (2.60 लाख करोड रूपये.) इतकी आहे. जागतिक पातळीवर मुकेश अंबानी ३३ व्या क्रमांकावरून १९ व्या क्रमांकावर पोहचले आहेत. २०१७ मध्ये २३.२ अब्ज डॉलर्सच्या संपत्तीसह ते ३३ व्या स्थानावर होते. अझीम प्रेमजी यांनी लक्ष्मी मित्तल यांना यंदा मागे टाकत भारतातले सर्वाधिक श्रीमंतांचं दुसरं स्थान मिळवलं आहे. जिंदाल स्टील अँड पावरच्या सावित्री जिंदाल या सर्वाधिक श्रीमंत भारतीय महिला ठरल्या आहेत. जागतिक क्रमवारीत त्या ८.८ अब्ज डॉलर्सच्या संपत्तीसह १७६ व्या स्थानावर आहेत. पेटीएमचे संस्थापक विजय शेखर शर्मा १.७ अब्ज डॉलर्ससह जागतिक यादीतले सर्वात कमी वयाचे भारतीय अब्जाधीश ठरले आहेत. एचसीएलचे संस्थापक शीव नाडर चौथे तर सन फार्माचे दिलीप संघवी पाचवे श्रीमंत भारतीय ठरले आहेत. या यादीत जगातल्या एकूण २,२०८ अब्जाधीशांची नावं आहेत. या सर्वांची मिळून एकूण संपत्ती ९.१ लाख कोटी (ट्रिलिअन) आहे. मागील वर्षीपेक्षा या संपत्तीत १८ टक्के वाढ झाली आहे.
मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स आणि वॉरन बफे ९० अब्ज डॉलर्सच्या संपत्तीसह दुसऱ्या स्थानावर आहेत. दोघांनीही आपली बहुतांश संपत्ती दान करण्याचा निर्णय घेतला आहे. यंदा जगातल्या टॉप २० अब्जाधीशांच्या यादीत दोन चायनीज उद्योगपतींचा क्रमांक आला आहे. त्यापैकी एक चायनीज इंटरनेट जायंट टेनसेंटचे सीईओ मा हॉतेंग तर दुसरे अलिबाबाचे संस्थापक जॅक मा आहेत. यंदा फोर्ब्जच्या यादीत २५९ उद्योगपतींचा नव्याने समावेश झाला आहे.