नवी दिल्ली : भारतीय हवाई दलातील ४० ‘सुखोई’ विमानांवर ध्वनिहूनही अधिक वेगाने मारा करणारी ‘ब्राह्मोस’ क्षेपणास्त्रे बसविण्याचे काम सुरु झाले आहे. हे काम पूर्ण झाल्यावर भारताच्या भवतालच्या क्षेत्रातील बदलत्या सुरक्षा आव्हानांना अधिक सक्षमतेने सामोरे जाण्यासाठी हवाई दलाची एक महत्वाची गरज पूर्ण होईल.हवाई दलातील सुखोई विमानांचा ताफा ‘ब्राह्मोस’ क्षेपणास्त्रांनी सुसज्ज करण्यात येत आहे व त्यासाठी वेळापत्रकही ठरले आहे, असे अधिकृत सूत्रांनी सांगितले. सूत्रांनी याचा कालावधी स्पष्ट केला नसला तरी हे काम सन २०२० पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे.सुखोई-३० जातीच्या विमानावर बसविले जाणारे ‘ब्राम्होस’ हे सर्वात वजनदार अस्त्र असेल. हे क्षेपणास्त्र सुखोई विमानातून सोडून लक्ष्याचा अचूक वेध घेण्याची चाचणी २२ नोव्हेंबर रोजी यशस्वीपणे करण्यात आली होती.सुखोई लढाऊ विमानांची एक संपूर्ण स्वॉड्रन ‘ब्राह्मोस’ क्षेपणास्त्राने सज्ज झाली की समुद्र किंवा जमिनीवरील लक्ष्यावर दूरच्या टप्प्यावरून मारा करण्याची हवाई दलाची क्षमता कित्येक पटींनी वाढेल. एक अधिकारी म्हमाला की, हवाई दलास कदाचित दोन आघाड्यांवर एकाच वेळी लढावे लागण्याची शक्यता नाकारता येत नसल्यानेहवाई हल्ल्याची क्षमता वाढविण्याच्या दृष्टीने हे काम अत्यंत महत्वाचेआहे.‘ब्राह्मोस’च्या हवाई प्रकाराची चाचणी यशस्वी झाल्यानंतर हवाई दलाने असा विश्वास व्यक्त केला होता की, अत्यंत कार्यक्षम अशा सुखोई लढाऊ विमानास या भेदक क्षेपणास्त्राची जोड मिळाल्यावर सागरी व जमिनीवरील युद्धभूमीवर प्रभुत्व गाजविण्यासाठी दूर आणि खोलवर हल्ला करण्याची क्षमता आत्मसात होईल.‘ब्रोह्मोस’ क्षेपणास्त्र पंखांवरून वाहून नेण्यासाठी सुखोई विमानांमध्ये काही रचनात्मक फेरबदल करावे लागतील. हे काम ‘हिंदुस्तान एअरोनॉटिक्स लि.’च्या (एचएएल) कारखान्यात केले जात आहे. यासाठी सुखोईमध्ये यात्रंकी, विद्युतीय व सॉफ्टवेअरचे फेरबदल करावे लागणार असल्याने हे काम बरेच गुंतागुंतीचे आहे.
४० सुखोर्इंचा ताफा होणार ‘ब्राह्मोस’ सज्ज, हवाई दलाचे सामर्थ्य वाढणार; २०२० पर्यंत काम पूर्ण होणे अपेक्षित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2017 12:51 AM