योगेश बिडवई, लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: कांद्याचे दर वाढण्याच्या भीतीने केंद्र सरकारने शनिवारी निर्यातीवर ४० टक्के शुल्क लागू केले. ३१ डिसेंबरपर्यंत कांद्यावर निर्यातशुल्क लागू असेल. देशांतर्गत बाजारपेठेत कांद्याची पुरेशी उपलब्धता राहावी, यासाठी शुल्क लागू केल्याचे केंद्रीय अर्थ मंत्रालयाने अधिसूचनेत म्हटले आहे.
शेतकऱ्यांना फटका बसणार
गेल्या वर्षी झालेला अवेळी पाऊस आणि त्यानंतर लांबलेला उन्हाळा यामुळे कांद्याचा दर्जा घसरला. परिणामी वर्षभर शेतकऱ्यांना कांद्याला भाव मिळाला नाही. त्यातच आता निर्यात शुल्क लागू केल्यानंतर भाव घसरण्याची भीती आहे. त्याचा मुख्यत: महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना फटका बसेल.
का निर्णय?
उशिरा आलेल्या पावसाने खरिपाच्या कांद्याचे बाजारात ऑक्टोबरमध्ये आगमन होण्याची शक्यता. त्यामुळे कांद्याची टंचाई निर्माण होऊन भाव वाढण्याची भीती.
यंदा महाराष्ट्रात पावसाचे उशिरा आगमन झाल्याने नवीन कांदा उशिरा येणार आहे. त्यातच गेल्या वर्षी अतिवृष्टीने कांदा खराब झाला होता. उन्हाळ कांदाही आता खराब होत आहे. केंद्राचा निर्णय शेतीस मारक ठरेल. - बाळासाहेब क्षीरसागर, सभापती, कृषी उत्पन्न बाजार समिती, लासलगाव