ऑनलाइन लोकमत
हैदराबाद, दि. 28 - मुथूट फायनान्सच्या हैदराबादमधील शाखेत चोरी झाली असून 40 किलो सोने चोरीला गेले आहे. बीरामगुडा परिसरात ही चोरी झाली आहे. 8 कोटी किंमतीचे 40 किलो सोने बंदुकीचा धाक दाखवत लूटण्यात आले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पाच शस्त्रधारी चोर सकाळी 9.30 वाजताच्या सुमारास शाखेत घुसले. त्यावेळी शाखेत कर्मचारी साफसफाईचं काम करत होता. चोरांनी कर्मचा-याला बंदुकीचा धाक दाखवत लॉकरची तोडफोड केली आणि सोनं घेऊन फरार झाले. चोरी करण्याआधी चोरांनी सर्व सीसीटीव्ही काढून ठेवले होते. तसंच हार्ड डिस्कची आपल्यासोब घेऊन गेले. पोलीस परिसरात असलेल्या इमारतींचं सीसीटीव्ही फुटेज तपासत आहेत.
40 Kgs Gold robbed from a Muthoot Finance branch in Hyderabad— ANI (@ANI_news) 28 December 2016
नोटाबंदी निर्णायनंतर मुथूट फायनान्समध्ये चोरी होण्याची ही तिसरी घटना आहे. काही दिवसांपुर्वी अज्ञात चोरांनी बंदुकीचा धाक दाखवत राजकोटमधील शाखेतून पाच किलो सोनं चोरलं होतं. या सोन्याची किंमत तब्बल 90 लाख रुपये होती.
दुस-या घटनेत गुजरातमधील धोराजी येथील शाखेतून 90 लाख रुपये चोरीला गेले होते. मिळालेल्या माहितीनुसार तीन ते चार जणांनी मिळून ही चोरी केली होती. याप्रकरणी सध्या चौकशी सुरु आहे. मात्र चोरीला गेलेली रक्कम जुन्या नोटांमध्ये होती की नव्या याची माहिती अजून मिळालेली नाही. त्यानंतर आता हैदराबादमध्ये ही चोरी झाली आहे.