बलवंत तक्षक ,लोकमत न्यूज नेटवर्क
चंडीगड : हिमाचल प्रदेशात आजारी मुलीला उपचारार्थ रुग्णालयात नेण्यासाठी कुटुंबीयांनी खुर्चीत बसवून ४० किलोमीटर दूर नेले. कुल्लू जिल्ह्यातील सैंज खोऱ्यातील गाडापारलीमध्ये झालेल्या जोरदार पावसानंतर लोकांच्या अडचणी वाढल्या आहेत. रुग्णांना खुर्चीत बसवून हॉस्पिटलमध्ये घेऊन जावे लागत आहे. गाडापारली गावापासून आठ किमी अंतरावर हा रस्ता आहे.
मात्र, पाऊस आणि भूस्खलनाने रस्ते वाहून गेले आहेत. मेल गावातील सरला या तरुणीचे पोट अचानक दुखू लागले. तिच्या कुटुंबीयांनी नातेवाइकांच्या मदतीने तिला खुर्चीवर बसवून ४० किलोमीटरचा प्रवास जंगल आणि कच्चा रस्ता तुडवत पार केला.
निहारणी गावात पोहोचल्यानंतर त्यांना रस्ता सापडला आणि रुग्णाला उपचारासाठी कुल्लू येथे दाखल करण्यात आले. या भागात अगोदरच मूलभूत सुविधा नाहीत, आता पुरामुळे लोकांच्या अडचणी वाढल्या आहेत. गेल्या चार दिवसांत रुग्णांना खुर्च्यांवर बसवून कुल्लूला नेण्याची ही तिसरी वेळ आहे.