कोलकाता : सध्या देशभरात लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरु आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पश्चिम बंगालमधील राजकीय वातावरण तापले आहे. दरम्यान, वर्धमान-दुर्गापूरमधून तृणमूल काँग्रेसचे उमेदवार आणि माजी क्रिकेटपटू कीर्ती आझाद यांनी मंगळवारी अर्ज दाखल केला. उमेदवारी दाखल केल्यानंतर कीर्ती आझाद यांनी आपले प्रतिस्पर्धी आणि भाजपाचे उमेदवार दिलीप घोष यांच्यावर 'बच्चा-बच्चा' अशा शब्दांत हल्लाबोल केला.
कीर्ती आझाद यांच्याकडून दाखल करण्यात आलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार, त्यांच्याकडे एकूण चार गाड्या आहेत. यामध्ये २ स्कॉर्पिओ, एक टाटा निक्सन आणि एक मारुती सियाझ कार आहे. दागिन्यांबद्दल बोलायचे झाले तर, कीर्ती आझाद यांच्याकडे २३० ग्रॅम सोने आहे. ज्याची बाजारात किंमत जवळपास १३ लाख ८० हजार रुपये आहे.
कीर्ती आझाद यांची जंगम मालमत्ता ३ कोटींहून अधिक आहे. ज्यात बँकांमध्ये जमा केलेले पैसे, म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक यांचा समावेश आहे. तसेच, स्थावर मालमत्तेबद्दल बोलायचे झाल्यास, कीर्ती आझाद यांच्याकडे ६ कोटी रुपयांपेक्षा जास्त संपत्ती आहे. याशिवाय, कीर्ती आझाद यांच्यावर कर्ज ४० लाख रुपयांपेक्षा जास्त आहे.
कीर्ती आझाद हे १९८३ मध्ये विश्वचषक जिंकलेल्या भारतीय क्रिकेट संघातील एक सदस्य होते. सध्या ते राजकारणात असून लोकसभेच्या वर्धमान-दुर्गापूर मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. या मतदारसंघात त्यांचे प्रतिस्पर्धी भाजपाचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि खासदार दिलीप घोष आहेत.
यंदाच्या लोकसभा निवडणुकीत भाजपाने जुन्या केंद्र मेदिनीपूरमध्ये दिलीप घोष यांना तिकीट दिले नाही. त्याऐवजी दिलीप घोष यांना वर्धमान-दुर्गापूरमधून उमेदवारी दिली आहे. नवीन लोकसभा मतदारसंघात आल्यानंतर दिलीप घोष स्वाभाविकपणे त्यांचे प्रतिस्पर्धी कीर्ती आझाद यांच्यावर हल्लाबोल करत आहेत. त्यामुळे कीर्ती आझाद यांनीही उमेदवारी अर्ज भरल्यानंतर आपल्या शैलीत दिलीप घोष यांचा समाचार घेतला.