नवी दिल्ली : नेपाळ आणि भारतात झालेल्या विनाशकारी भूकंपात सर्वस्व गमावून बसलेल्या भूकंपपीडितांच्या मदतीसाठी लोकमत परिवाराने दिलेला ४० लाख रुपयांचा धनादेश लोकमत वृत्तपत्र समूहाच्या एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन खासदार विजय दर्डा यांच्या नेतृत्वात एका उच्चस्तरीय शिष्टमंडळाने सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे सुपूर्त केला़ या निधीपैकी २० लाख रुपये लोकमत वृत्तपत्र समूहातील कर्मचाऱ्यांच्या एक दिवसाचे वेतन तर तेवढीच रक्कम लोकमत व्यवस्थापनाकडून (दर्डा परिवार) देण्यात आली आहे.या शिष्टमंडळात लोकमत वृत्तपत्र समूहाचे संपादकीय संचालक आणि संयुक्त व्यवस्थापकीय संचालक ऋषी दर्डा, कार्यकारी संचालक करण दर्डा, असिस्टंट व्हाईस प्रेसिडेंट (नॉर्थ) आशीष भाटिया सहभागी होते. नैसर्गिक संकटात सापडलेल्या नागरिकांना लोकमतने नेहमीच मदतीचा हात पुढे केला आहे़़ याची मोदी यांनी मुक्तकंठाने प्रशंसा केली. या भेटीत खा. दर्डा यांनी मोदींना ते पंतप्रधान बनले त्या दिवशीच्या लोकमतचे मुखपृष्ठ असलेली फोटोफ्रेमही भेट दिली. मोदींनी या फोटो फ्रेमवर स्वत:च्या हस्ताक्षरात ‘विजय के साथ विजय पर्व’ असे लिहून ते खा. दर्डा यांच्याकडे सोपविले. (विशेष प्रतिनिधी)
नेपाळ भूकंप पीडितांसाठी लोकमतने दिले ४० लाख
By admin | Published: May 12, 2015 1:18 AM