हिसार : हरियाणातील हिसारयेथे 40 मुस्लीम कुटुंबांतील तब्बल 250 जणांनी शुक्रवारी पुन्हा हिंदू धर्मात प्रवेश केला. ही घटना बिढमीरा गावात घडली. या कुटुंबांपैकी एका कुटुंबाने तर 80 वर्षीय मृत महिलेवरही हिंदू पद्धतीनेच अंत्य संस्कार केले आहेत.
यापूर्वी 18 एप्रिलला जींद येथील दनोडा गावात 6 मुस्लीम कुटुंबातील 35 जणांनी हिंदू धर्मात प्रवेश केला होता. गावकऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, बीडमीरा गावातील 40 मुस्लीम कुटुंबांनी पुन्हा हिंदू धर्मात प्रवेश केला आहे. स्वातंत्र्यापूर्वी ते जींदमधील दनोडा गावात राहत होते.
हिंदू धर्म स्वीकारलेल्या सतबीर यांनी सांगितले, त्यांची आई फूली देवी यांचे शुक्रवारी निधन झाले. यानंतर येथील मुस्लीम कुटुंबांनी ठरवले, की जर ते स्वतःला हिंदूच समजतात आणि हिंदू धर्मातील सर्वच प्रथा परंपरा पाळतात तर वृद्ध महिलेवरही हिंदू पद्धतीनेच अंत्यसंस्कार करायला हवेत. यापूर्वी येथे कुणाचे निधन झाले, तर त्याच्यावर मुस्लीम रीती-रिवाजानुसारच अंत्यसंस्कार होत होते.
'औरंगजेबाच्या दबावाला बळीपडून पूर्वजांनी स्वीकारला होता मुस्लीम धर्म' -सतबीर यांनी दावा केला, की ते डूम समाजाचे आहेत. तसेच आपल्या पूर्वजांनी औरंगजेबाच्या दबावापोटी मुस्लीम धर्म स्वीकारला होता, असे आपण ऐकले आहे. आमचे संपूर्ण गाव हिंदू धर्मातील सर्व सण-उत्सव साजरे करते. केवळ अंत्य संस्कारच मुस्लीम पद्धतीने होत होते. तसेच पुन्हा हिंदूधर्मात येण्यासाठी आपल्यावर कुणाचाही आणि कसल्याही प्रकारचा दबाव नाही, असेही त्यांनी स्पष्ट कले.