नवी दिल्ली - जागतिक हवामान बदलांसाठी जबाबदार असलेल्या घटकांपैकी एक नायट्रस ऑक्साइड (एन२ओ) उत्सर्जन १९८० ते २०२० दरम्यान ४० टक्क्यांनी वाढले, त्यातही चीन सर्वांत जास्त उत्सर्जन करणारा देश आहे, त्यानंतर भारत आणि अमेरिका यांचा क्रम लागतो, असे एका नवीन अभ्यासात नमूद करण्यात आले आहे. हवामान शास्त्रज्ञांच्या ‘ग्लोबल कार्बन प्रोजेक्ट’ने केलेल्या अभ्यासात म्हटले आहे की, गेल्या दशकात नायट्रस ऑक्साइड उत्सर्जनांपैकी ७४ टक्के नायट्रोजन खतांचा आणि शेतीतील जनावरांच्या खाद्याच्या वापरातून आला आहे.
नायट्रस ऑक्साइड हा कार्बन डायऑक्साइड आणि मिथेननंतरचा तिसरा सर्वांत महत्त्वाचा हरितगृह वायू आहे आणि कार्बनपेक्षा २७३ पट अधिक घातक आहे. हरितगृह वायूंच्या वाढीमुळे पृथ्वीच्या पृष्ठभागाचे सरासरी तापमान १८५०-१९०० च्या सरासरीच्या तुलनेत १.१५ अंश सेल्सिअसने आधीच वाढले आहे. एन्थ्रोपोजेनिक नायट्रस ऑक्साइड उत्सर्जनाने या तापमानवाढीमध्ये सुमारे ०.१ अंश वाटा उचलला. २०२२ मध्ये वातावरणातील नायट्रस ऑक्साइडचे प्रमाण प्रति अब्ज ३३६ भागांपर्यंत पोहोचले, जे १८५०-१९०० च्या तुलनेत २५ टक्क्यांनी जास्त आहे.