नवी दिल्ली - सत्तेत असणा-या नरेंद्र मोदी सरकारवरील नाराज लोकांची संख्या वाढली आहे. फक्त 10 महिन्यात नाराज लोकांचा आकडा 40 टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे. याआधी 2017 मध्ये नरेंद्र मोदी सरकावर नाखूश असणा-यांचा आकडा 27 टक्के इतका होता, जो 13 टक्क्यांनी वाढून 40 टक्क्यांवर पोहोचला आहे. याचाच अर्थ नरेंद्र मोदी सरकारची लोकप्रियता कमी झाली आहे. केंद्रात नरेंद्र मोदी सरकारला तीन वर्ष नऊ महिने पुर्ण झाले आहेत. दरम्यान विरोध पक्ष वारंवार केंद्र सरकारवर हल्लाबोल करत असून आश्वासनं फोल ठरली असल्याची टीका करत आहे. यानंतर एबीपी न्यूजने सीएसडीएस-लोकनितीसोबत मिळून केलेल्या ओपिनियन पोलमधून ही आकडेवारी समोर आली आहे. 19 राज्यांमधील 175 लोकसभा मतदारसंघात 7 ते 20 जानेवारीदरम्यान हा सर्व्हे करण्यात आला.
सर्व्हेनुसार पूर्व भारत म्हणजेच बिहार, बंगाल, झारखंड, ओडिसा आणि आसाममध्ये जर आज निवडणूक झाली तर एकूण 142 लोकसभा जागांपैकी भाजपा आणि त्यांच्या सहकारी पक्षांना 72 तर काँग्रेस आणि त्यांच्या सहकारी पक्षांना (युपीए) 18 आणि इतरांना 52 जागा मिळतील. तज्ञांनी सांगितल्यानुसार, एनडीएच्या जागांमध्ये झालेल्या वृद्धीमुळेच बिहारमध्ये नितीश कुमार यांचा पक्ष जनता दल युनायटेडसोबत हातमिळवणी झाली आहे.
सर्व्हेनुसार दक्षिण भारत म्हणजेच कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणा, तामिळनाडू आणि केरळमध्ये एनडीएची स्थिती नाजूक होण्याची शक्यता असून, युपीएला फायदा होऊ शकतो. तेथील एकूण 132 जागांपैकी एनडीएला 34, युपीएला 63 आणि इतरांना 35 जागा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 2017 मध्ये कऱण्यात आलेल्या सर्व्हेनुसार, एनडीएला 39, युपीएला 52 आणि इतरांना 41 जागा मिळण्याची शक्यता होती. याचाच अर्थ दक्षिण भारतात एनडीएच्या लोकप्रियतेत घट झाली आहे. एनडीएला पाच जागांचं नुकसान होत असून, युपीएला मात्र 11 जागांचा फायदा होत आहे. इतरांना सहा जागांचं नुकसान होत आहे. या सर्व्हेत स्पष्ट करण्यात आलं आहे की, यावर्षी कर्नाटकात होणा-या निवडणुकीत भाजपाला सत्तेत परत येण्यासाठी प्रचंड मेहनत करावी लागणार आहे.
सर्व्हेनुसार उत्तर भारत म्हणजे उत्तर प्रदेश, राजस्थान, दिल्ली, पंजाब, हरियाणामधील एकूण 151 लोकसभा जागांवर आज निवडणूक झाल्यास एनडीएला 2014 च्या तुलनेत 20 जागांचं नुकसान होऊ शकतं. एनडीएला 111 जागा मिळण्याची शक्यता आहे. 2014 मधील लोकसभा निवडणुकीत एनडीएला येथून 131 जागा मिळाल्या होता. उत्तर भारतात युपीएला 13 जागा तर इतरांना 27 जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.