लखनऊ : उत्तर प्रदेशात गेल्या चोवीस तासांमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे ४० लोक व अनेक जनावरांचा मृत्यू झाला आहे. तर कित्येक घरांची पडझड झाली आहे. राज्यात काही ठिकाणी अद्याप मुसळधार पाऊस सुरू असून त्यामुळे मृतांची संख्या वाढण्याची भीती आहे. पावसामुळे संकटात सापडलेल्या व्यक्तींना वाचविण्यासाठी राज्य सरकारने बचावकार्य हाती घेतले आहे.
जौनपूर येथील सरायखानी गावामध्ये भरतलाल नावाच्या व्यक्तीच्या घरी सर्व कुटुंबीय गाढ झोपेत असताना पावसाच्या तडाख्याने घराची भिंत कोसळून त्याखाली पाच जण दबले गेले. त्यापैकी तीन जण मरण पावले असून, दोन जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले. मुसळधार पावसामुळे अयोध्या रेल्वे स्थानकातही पाणी शिरले आहे. अयोध्या शहराच्या अनेक भागांतही पाणी साचले असून, त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. संततधारेमुळे उत्तर प्रदेशात काही भागांमध्ये घरांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. प्रयागराजमध्येही हीच अवस्था आहे.
मुसळधार पावसाच्या तडाख्याने काही ठिकाणी पाण्यात बुडून अनेक गुरेढोरे मरण पावली आहेत. बाराबंकी येथे मोठ्या प्रमाणावर हानी झाली आहे.