कोलकाता : देशभर सध्या नोटांची प्रचंड मारामार असून, चलन तुटवड्यामुळे प्रत्येक जण जमेल त्या मार्गाने ५00 आणि १000 रुपयांचे सुटे मिळवण्याच्या प्रयत्नात दिसत आहे. मात्र पश्चिम बंगालच्या अलीपोरमधील एका रुग्णालयातील एका रुग्णाच्या नातेवाइकांनी ४० हजार रुपयांच्या बिलाची रक्कम चिल्लरमध्ये भरून पेशंटचा डिस्चार्ज मिळवला. सुकांत छाऊल असे रुग्णाचे नाव आहे.डेंग्यूने आजारी असलेल्या सुकांत यांना न्यू अलीपोर भागातील बी. पी. पोद्दार हॉस्पिटल अॅण्ड रिसर्च सेंटरमध्ये उपचारांसाठी दाखल करण्यात आले होते. रुग्णालयाच्या डॉक्टरांनी सुकांत यांना बुधवारी डिस्चार्ज देत असल्याचे सांगितले. पण डिस्चार्जपूर्वी ४० हजार रुपयांचे बिल जमा करण्याच्या सूचना प्रशासनाने दिल्या. सुकांतच्या कुटुंबीयांनी ५०० आणि १ हजार रुपयांच्या नोटा भरण्यासाठी दिल्या. पण त्या चलनातून बाद झाल्याने ते स्वीकारण्यास व्यवस्थापनाने नकार दिला. पाचशे आणि एक हजार रुपयांच्या नोटा न स्वीकारल्याने कुटुंबीयांनी हॉस्पिटलला चेकने रक्कम देण्याचे ठरविले. पण चेक नको, रोख रक्कमच आणून भरा, असे रुग्णालयातर्फे सांगण्यात आले. अखेर सुकांतच्या कुटुंबीयांनी आपल्या सर्व नातेवाईक व मित्रांना व्हॉट्सअॅपवरून मदतीचे आवाहन केले. या आवाहनाला त्यांना प्रचंड प्रतिसाद मिळाला. पण जमा झाली ४० हजार रुपयांची नाणी. ही ४० हजारांची नाणी मोठ्या पिशवीत भरून, ते ती घेऊन रुग्णालयात गेले. नाण्यांची थैली बघून रुग्णालयाला धक्का बसला. त्यांनी चिल्लरमध्ये बिल स्वीकारण्यासही नकार दिला. त्यामुळे संतापलेल्या कुटुंबीयांनी या चलनावर बंदी नाही. त्यामुळे तुम्ही त्या स्वीकारल्या नाहीत, तर आम्ही पोलिसात तक्रार करू, असे रुग्णालयाच्या प्रशासनाला सांगितले. या इशाऱ्यामुळे नरमलेल्या रुग्णालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी अखेर ती थैली स्वीकारली. सहा जणांनी मिळून तब्बल तीन तास बसून ही नाणी मोजली. ती रक्कम बरोबर ४0 हजार रुपये असल्याने त्यानंतर दुपारी तीन वाजता सुकांतला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. (वृत्तसंस्था)
४0 हजार रुपयांची चिल्लर भरून रुग्णाचा केला डिस्चार्ज
By admin | Published: November 12, 2016 2:57 AM