असे म्हणतात की, प्रेमाला वय नसते...कुठल्याही वयात कोणावरही प्रेम होऊ शकते. राजस्थानमधून प्रेमाची एक अनोखी कहानी समोर आली आहे. बांसवाडा जिल्ह्यातील 80 वर्षीय रंगजी आणि 78 वर्षीय रुपी यांनी या वयात लगीनगाठ बांधली. आयुष्याच्या या टप्प्यावर अनेकजण आपले जीवन आरामात आणि शांतीने घालवण्याचा विचार करतात, अशा काळात या दोघांनी लग्न केले. या दोघांची प्रेमकथा एखाद्या चित्रपटाच्या पटकथेपेक्षा कमी नाही.
रंगजी आणि रुपीची प्रेमकहाणी 1985 मध्ये सुरू झाली. दोघेही बांसवाडा येथील संगमेश्वर महादेव मंदिराच्या जत्रेत भेटले. पहिल्याच भेटीत दोघांचे एकमेकांवर प्रेम जडले. पुढे काही कारणास्तव दोघांचे लग्न होऊ शकले नाही. पण, दोघांमधील प्रेम इतके खोल होते की, रंगजीने सुमारे 20 वर्षांपूर्वी रुपीला आपल्या घरी आणले आणि तेव्हापासून दोघेही लग्न न करता एकत्र राहत होते.
40 वर्षांनंतर लग्नसमाजाने दोघांनाही पती-पत्नी म्हणून स्वीकारले होते, पण त्यांचे अद्याप लग्न झालेले नव्हते. रविवारी त्यांच्या प्रेमात एक नवीन अध्याय जोडला गेला. गोविंदपुरा दौलतगड येथे नातेवाईक, समाजातील लोकांच्या उपस्थितीत रंगजी आणि रुपी यांचे पूर्ण विधींसह लग्न लावण्यात आले. हा लग्न सोहळा खूप खास होता, सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद होता. अग्नीच्या साक्षीने दोघांनी एकमेकांना जीवनसाथी म्हणून स्वीकारले. यानंतर दोघेही अधिकृतपणे पती-पत्नी बनले.