नवी दिल्ली - देशभरातील पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल दोन मे रोजी लागले. सर्वांचे लक्ष लागलेल्या पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांनी भाजपला पराभवाचा मोठा धक्का दिला. मात्र, यानंतर आता बंगालमध्ये हिंसाचाराच्या मोठ्या घटना घडत असल्याचे पाहायला मिळत आहे. तृणमूल काँग्रेस आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये झटापटी झाल्या असून, यामध्ये 9 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. याच दरम्यान विधानसभा निवडणूकीनंतर झालेल्या हिंसाचारापासून आपला बचाव करण्यासाठी बंगालमधील भाजपाचे सुमारे 400 कार्यकर्ते आणि त्यांचे कुटुंबीय आसाममध्ये आले आहेत असा दावा भाजपाच्या नेत्याने केला आहे.
आसामचे मंत्री हेमंत बिस्वा शर्मा (Himanta Biswa Sarma) यांनी 300 ते 400 कार्यकर्ते हिंसाचारानंतर आसाममध्ये आल्याचं म्हटलं आहे. हेमंत बिस्वा शर्मा यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं असून काही फोटो शेअर केले आहेत. "भाजपा बंगालचे 300 ते 400 कार्यकर्ते आणि त्यांचे कुटुंबीय छळ आणि हिंसाचाराचा सामना केल्यावर आसाममधील धुबरी येथे निघून आले आहेत. आम्ही त्यांना निवारा आणि अन्न देत आहोत. दीदींनी लोकशाहीच्या नावाखाली सुरू असलेले कुरूप नृत्य थांबवायलाचं हवं! बंगाल यापेक्षा अधिक चांगल्यासाठी पात्र आहे" अशा शब्दात हेमंत बिस्वा शर्मा यांनी ममता बॅनर्जींवर निशाणा साधला आहे.
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा दोन दिवसाच्या कोलकाता दौऱ्यावर असून, बंगालमध्ये होत असलेल्या हिंसाचाराबाबत दुःख व्यक्त केले आहे. पश्चिम बंगालची निवडणूक तृणमूल काँग्रेस आणि भाजपसाठी प्रतिष्ठेची झाली होती. अटीतटीचा सामना होण्याचा अंदाज खोटा ठरवत तृणमूलने भाजपला रोखून तिसऱ्यांदा सत्ता मिळवली. भाजपच्या पराभवानंतर राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा प्रथमच कोलकाता येथे पोहोचले. विमानतळावर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. वैचारिक लढाई लढण्यासाठी वचनबद्ध आहोत, असे नड्डा यांनी यावेळी नमूद केले.
हिंसाचाराच्या घटना चिंताजनक आणि धक्कादायक
पश्चिम बंगालमधल्या निवडणुकीच्या निकालानंतर तिथे घडलेल्या हिंसाचाराच्या घटना चिंताजनक तसेच धक्कादायक आहेत. अशा घटना भारताच्या फाळणीच्या वेळी घडल्याचे ऐकले होते. स्वतंत्र भारतात निवडणूक निकालानंतर अशा प्रकारच्या घटना घडल्याचे कधी पाहिले नव्हते. तृणमूलकडून होणारे हे प्रकार असहिष्णू आहेत. आम्ही लोकशाही पद्धतीने याविरुद्ध लढणार आहोत. आता पुढे या हिंसाचारामध्ये मृत्युमुखी पडलेल्यांच्या परिवारांना भेटी देणार आहे, असे नड्डा यांनी सांगितले.